Arjun Tendulkar Rishabh Pant Video: आयपीएलचा १९वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होत असून, सर्व १० संघांनी त्यांच्या सराव शिबिरांना सुरुवात केली आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळलेला अर्जुन तेंडुलकर या आयपीएल हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. अर्जुन काही दिवसांपूर्वी लखनौ संघात सामील झाला असून, तो एकाना क्रिकेट स्टेडियमवर सराव करत आहे. या दरम्यानचा त्याचा ऋषभ पंतबरोबरचा संवाद साधतानाचा एक व्हीडिओ समोर आला आहे.
अर्जुन तेंडुलकरसोबत लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत तिथे उपस्थित होता आणि ते दोघे बॅटच्या वजनाबद्दल बोलत होते. यादरम्यान अर्जुन तेंडुलकरने जेव्हा सचिन तेंडुलकरच्या बॅटच्या वजनाबद्दल सांगितलं तेव्हा ऋषभ पंत थक्क झाला. यानंतर ऋषभ पंतने एक कॅप्टन म्हणून आपल्या संघ सहकाऱ्याशी चर्चा करत त्याला काही लागल्यास बिनधास्त बोल असं म्हणाला.
पंतने अर्जुनला विचारलं, “तुझी बॅट किती वजनाची आहे?” अर्जुनने उत्तर दिलं, “१२२० ग्रॅम.” मग पंतने अर्जुनला विचारलं की जड बॅटचा काय फायदा असतो, त्यावर अर्जुनने उत्तर दिलं, “फक्त चेंडूला स्पर्श करायचा आणि झालं.” अर्जुन पुढे म्हणाला, “माझे वडील १३१०-१३१५ पौंडाच्या बॅटने खेळायचे.” अर्जुन म्हणाला की तो १२०० ग्रॅमपेक्षा हलकी बॅट वापरत नाही. सचिन तेंडुलकरने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जड बॅट वापरली. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टरने १०० शतकं झळकावली आहेत.
त्याच व्हिडिओमध्ये, ऋषभ पंत आपल्या संघाचा नवीन गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू, अर्जुन तेंडुलकरचं क्रिकेटप्रति असलेलं प्रेम पाहून भारावला होता. पंत म्हणाला, “तू युवी पाजींसोबत सतत सराव करत होतास? अगदी तुझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा. तू खूपच उत्साही आहेस.” अर्जुन तेंडुलकरने ५ मार्च रोजी सानिया चंडोकशी लग्न केलं आणि दुसऱ्या दिवशी डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत तो खेळण्यासाठी उतरला. पंतने त्याच्या खेळाबद्दलच्या आवडीचे कौतुक केलं.
ऋषभ पंतने यानंतर व्हीडिओच्या शेवटी अर्जुनला सांगताना दिसला. काहीही असलं काही लागलं तर बिनधास्त बोल, मी कायम तुझ्यासाठी फ्री आहे बोलायला. कर्णधार ऋषभच्या या वाक्यानेही सर्वांची मनं जिंकली. तर अर्जुून तेंडुलकरची क्रिकेटबद्दलची आवड पाहूनही चाहते थक्क झाले.
लखनौ सुपर जायंट्ससाठी मागचा आयपीएल हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला होता आणि या हंगामात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. लखनौ संघ आगामी हंगामातील आपला पहिला सामना १ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळेल.
