Arjun Tendulkar Saaniya Chandok Wedding Inside Updates: अर्जुन तेंडुलकर व सानिया चंडोक लग्नबंधनात अडकले आहेत. सचिन तेंडुलकरच्या लेकाच्या लग्नाची धामधुम मुंबईत सुरू होती. अर्जुन व सानिया यांच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो, व्हीडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर आता या जोडप्याने ५ मार्च २०२६ रोजी सकाळी मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय, जवळचे मित्र आणि अनेक नामांकित पाहुणे उपस्थित होते. अर्जुन सानियाचं लग्न ‘साज’ नावाच्या थीमवर आधारित होतं. तर लग्नानंतर पंगतीमध्ये पाहुण्यांना जेवणाचा आस्वाद घेता आला.

‘साज’ थीमवर आधारित अर्जुन सानियाचं लग्न

अर्जुन आणि सानियाचा विवाहसोहळा हा ‘साज’ या खास थीमवर आधारित होता. यापूर्वी झालेल्या मेहेंदी समारंभाच्या तुलनेत लग्नाच्या सजावटीत साधेपणा आणि देखणपणा यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. या लग्नसोहळ्यासाठीचे वेडिंग प्लॅनर Eternity by Trinity यांच्या माहितीनुसार, लग्नासाठी २७० डिग्री सेंटर मंडप उभारण्यात आला होता, ज्यामुळे विधींसाठी एक पवित्र आणि आकर्षक वातावरण तयार करण्यात आलं.

सजावटीसाठी हलक्या आणि स्वप्नवत वाटेल अशा रंगसंगतीचा वापर करण्यात आला होता. बेबीज ब्रीथ फुलांच्या थरांसह ऑफ-व्हाईट, ब्लश पिंक, ताज्या हिरव्या रंगछटा आणि म्यूटेड गोल्ड अशा रंगांचा सुरेख संगम दिसत होता. या सजावटीमुळे शांत, ढगांसारखं वातावरण तयार झालं आणि संपूर्ण लक्ष नवविवाहित जोडप्यावर आणि लग्नाच्या विधींवर केंद्रित राहिलं.

हेही वाचा

भव्य सजावटीबरोबरच या लग्नसोहळ्याचं वातावरण लाईव्ह म्युझिकल परफॉर्मन्समुळे अधिक खास बनलं. प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौर यांनी वधू सानिया चंडोक हिच्या एन्ट्रीदरम्यान गाणं सादर केलं. सानिया मंडपाकडे चालत येत असताना त्या भावुक क्षणाला हर्षदीपच्या गाण्याने अधिक अविस्मरणीय केलं. याशिवाय, सोहळ्याला आणखी पारंपरिक रंग शंकर महादेवन यांनी मंगलाष्टके म्हटली.

अर्जुन-सानियाच्या लग्नातील पाहुण्यांसाठी खास महाराष्ट्रीयन पंगत

महाराष्ट्रीयन पद्धतीने झालेल्या या विवाहसोहळ्यात आणखी एक लक्षवेधी गोष्ट ठरली ती म्हणजे पंगत. विवाहसोहळ्याचे सर्व विधी पार पडल्यानंतर पाहुण्यांसाठी पारंपरिक महाराष्ट्रीयन पंगतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पंगतीमध्ये सर्व पाहुणे एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेत होते, ज्यामुळे पारंपरिक आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झालं. लग्न समारंभ तुलनेने खासगी आणि मर्यादित पाहुण्यांमध्ये पार पडला असला तरीही क्रीडा, राजकारण आणि बॉलीवूड क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

तेंडुलकरांच्या घरातील लग्न सोहळ्याला अमिताभ बच्चन, शाहरुख खान, फरहान अख्तर, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांच्यासह एमएस धोनी, युवराज सिंग व त्यांची पत्नी हेझल कीच, हरभजन सिंग व गीता बसरा, इरफान पठाण, झहीर खान व सागरिका घाटगे यांसारखे क्रिकेट आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच राजकीय क्षेत्रातील देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.