Arjun Tendulkar In T20 Mumbai League: भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या आयपीएल २०२६ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे. गेल्या काही हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. या हंगामात त्याला लखनौ सुपर जायंट्स संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरवर टी-२० मुंबई लीग स्पर्धेत पाटपट मोठी बोली लागली आहे.

येत्या काही दिवसात टी-२० मुंबई लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या हंगामासाठीचा लिलाव सोहळा शनिवारी पार पडला. या लिलावासाठी अर्जुन तेंडुलकरने देखील नाव नोंदवलं होतं. त्याची बेस प्राईज २ लाख रुपये इतकी होती. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली. आर्क्स अंधेरी संघाने त्याच्यावर १० लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं आहे. अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे.

अर्जुन तेंडुलकर आता टी-२० वर्ल्डकप विजेता खेळाडू शिवम दुबेसोबत ड्रेसिंग रुम शेअर करताना दिसून येणार आहे. आर्क्स अंधेरी संघाने त्याला २० लाखांत रिटेन केलं आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या हंगामापर्यंत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. पण आयपीएल २०२६ स्पर्धेसाठीचा लिलाव होण्याआधी मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स संघासोबत ट्रेड केला. शार्दुल ठाकूर मुंबई इंडियन्स संघात आला. तर अर्जुन तेंडुलकर ३० लाखांच्या मुळ किंमतीत लखनौ सुपर जायंट्स संघात दाखल झाला.

अर्जुन तेंडुलकर आधी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा भाग होता. पण २०२२-२३ पासून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाचा भाग आहे. पण त्याला ही स्पर्धा खेळण्यासाठी विशेष अनुमती देण्यात आली आहे. अशीच सूट सिद्धात अधतराव याला देखील देण्यात आली आहे. मुंबई टी-२० लीग स्पर्धेला येत्या जून महिन्यात सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. आता अर्जुन तेंडुलकरला या स्पर्धेत संधी मिळणार का? जर संधी मिळाली तर तो कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.