मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं गुरुवारी थाटामाटात लग्न झालं. क्रिकेटविश्वातले असंख्य आजी माजी खेळाडू अर्जुन आणि सानिया चंडोक या दांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. गेले अनेक महिने या लग्नाची चर्चा होती. मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये विवाहसोहळा झाला. प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौर यांनी वधू सानिया चंडोक हिच्या एन्ट्रीदरम्यान गाणं सादर केलं. शंकर महादेवन यांनी मंगलाष्टके म्हटली.
२०२० पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेला अर्जुन यंदाच्या हंगामात नवीन संघाकडून खेळताना दिसणार आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन उपयुक्त फटकेबाजीही करतो. पाच हंगांमांमध्ये मिळून अर्जुन पाच सामने खेळला आहे. त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. २०२० मध्ये युएईत झालेल्या आयपीएल हंगामात अर्जुन मुंबई इंडियन्स संघात नेट बॉलर म्हणून होता. २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने २० लाख बेस प्राईजला त्याला संघात समाविष्ट केलं. २०२२ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबईने ३० लाख रुपये मोजून अर्जुनला संघात घेतलं. गुजरात टायटन्सने अर्जुनसाठी बोली लावली होती. मात्र मुंबई इंडियन्स अर्जुनला संघात घेण्यावर ठाम होतं.
पहिल्या दोन हंगामात अर्जुनला मुंबईसाठी एकही सामना खेळायची संधी मिळाली नाही. २०२३ मध्ये अर्जुनने आयपीएल पदार्पण केलं. नवीन चेंडू हाताळताना त्याने विकेटही पटकावली. चार सामन्यात अर्जुनने ३ विकेट्स घेतल्या. मात्र त्याने टाकलेल्या ५९ चेंडूंवर ९२ धावा चोपल्या गेल्या. पंजाब किंग्ज संघाने अर्जुनच्या एका षटकात चौकार,षटकारांची लयलूट केली होती. २०२४ हंगामात अर्जुनला एका सामन्यात खेळायची संधी मिळाली. त्यामध्ये २.२ षटकात त्याने २२ धावा दिल्या. त्याला विकेट मिळू शकली नाही.
२०२५ मेगा ऑक्शनमध्ये अर्जुन अनसोल्ड गेला. मात्र ऑक्शनच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईने त्याला संघात घेतलं. मात्र हंगामात एकदाही त्याला अंतिम अकरात संधी मिळू शकली नाही. याच हंगामात अश्वनी कुमार आणि सत्यनारायण राजू या युवा खेळाडूंनी पदार्पण केलं.
२०२६ हंगामाच्या पार्श्वभूमीवर अर्जुनला मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स संघाबरोबर ट्रेड केलं आहे. आता अर्जुन लखनौ संघाकडून खेळताना दिसेल. ऋषभ पंत, निकोलस पूरन, एडन मारक्रम, मिचेल मार्श यांच्याबरोबरीने अर्जुन खेळणार आहे.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सुरुवातीला मुंबईकडून खेळणाऱ्या अर्जुनने काही हंगामानंतर गोव्याकडून खेळायचा निर्णय घेतला.
