Who Is Arnav Paparkar: भारताचा युवा टेनिसपटू अर्णव पापरकरकडून विम्बल्डन २०२६ स्पर्धेत दमदार खेळ पाहायला मिळाला. पुण्यात राहणाऱ्या या १८ वर्षीय मराठमोळ्या टेनिसपटूचा तिसऱ्या फेरीतील सामना जपानच्या रयो तबातासोबत पार पडला. या सामन्यात अर्णव पापरकरने ६-२, ६-२ ने एकतर्फी विजयाची नोंद केली. याआधी दुसऱ्या फेरीत त्याचा सामना अमेरिकेच्या किटन हेंससोबत पार पडला. दरम्यान क्वार्टर फायनलमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करताच त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
विम्बल्डन ज्युनियर टेनिस स्पर्धेच्या मुलांच्या गटात क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करताच अर्णव पापरकरने इतिहासाला गवसणी घातली आहे. ३६ वर्षांनंतर पहिल्यांदाच कुठल्याही भारतीय खेळाडूने या स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. याआधी अशी कामगिरी लिएंडर पेस यांनी केली होती. त्यांनी १९९० मध्ये या स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी ते अवघ्या १७ वर्षांचे होते. इतकेच नव्हे, तर लिएंडर पेस यांनी या स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता.
क्वार्टर फायनलमध्ये पराभव
आतापर्यंत अर्णवने या स्पर्धेत दमदार खेळ केला होता. पण, क्वार्टर फायनलमध्ये अर्णवला अमेरिकेच्या जॉर्डन ली कडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना अर्णवने २-६,५-७ ने गमावला. हा सामना जरी गमावला असला, तरीदेखील क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणंही मोठी गोष्ट आहे. कारण गेल्या ३६ वर्षांत कुठल्याही भारतीय खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती.
कोण आहे अर्णव पापरकर?
अर्णव पापरकर हा पुण्यात राहतो. या मराठमोळ्या खेळाडूने कमी वयातच जगभरातील अनेक टेनिस स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. सध्या आयटीएफ ज्यूनियर रँकिंगमध्ये तो १९ व्या क्रमांकावर आहे. तो सध्या हेमंत बेंद्रे टेनिस अॅकेडमीत प्रोसोनजीत पॉल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. यासह स्पेनच्या सोटो अॅकेडमीत तो निजेल बीवर्स यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. याआधी ३ वर्षांपूर्वी २०२३ मध्ये त्याने मेलबर्न येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन १४ वर्षांखालील एशिया पॅसिफि स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता.
