इंग्लंडमधील बलाढ्य आर्सेनल फुटबॉल क्लबची प्रीमियर लीग जेतेपदाची २२ वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली. प्रीमियर लीगमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात विजय अनिवार्य असताना मँचेस्टर सिटीला बॉर्नमथविरुद्ध १-१ अशी बरोबरीच नोंदवता आली. त्यामुळे आर्सेनलचे २००३-०४ हंगामानंतरचे पहिले इंग्लिश प्रीमियर लीग जेतेपद निश्चित झाले.
माजी प्रशिक्षक आर्सन वेंगर यांच्या कार्यकाळाच्या अखेरीस आर्सेनलला निराशेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर उनाइ एमरी यांनाही आर्सेनलला यश मिळवून देता आले नाही. आर्सेनलने २०१९ मध्ये याआधी ‘मॅनेजर’ म्हणून काम करण्याचा अनुभव नसलेल्या मिकेल आर्टेटा यांच्याकडे संघाची जबाबदारी सोपवली. सुरुवातीला त्यांनाही संघर्ष करावा लागला. गेल्या तीन हंगामांत आर्सेनलला दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र, यंदाच्या हंगामात अगदी सुरुवातीपासून गुणतालिकेत अग्रस्थान टिकवून ठेवत आर्सेनलने दोन दशकांनंतर प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवले.
यंदाच्या हंगामातील आता एक सामना शिल्लक असताना आर्सेनलचे ८२ गुण झाले असून मँचेस्टर सिटीच्या खात्यावर ७८ गुण आहेत. त्यामुळे सिटीने अखेरचा सामना जिंकून तीन गुण मिळवले आणि आर्सेनलने आपला सामना गमावला, तरी सिटीचा संघ गुणतालिकेत आर्सेनलला गाठू शकणार नाही. मँचेस्टर सिटीने एप्रिलमध्ये झालेल्या सामन्यात आर्सेनलवर विजय मिळवत जेतेपदाच्या आशा पल्लवित केल्या होत्या.
मात्र, त्यानंतर सिटीला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. आर्सेनलने यानंतरचे चारही सामने जिंकले, तर सिटीला पाचपैकी दोन सामन्यांत बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळेच सिटीचा संघ गुणतालिकेत आर्सेनलपेक्षा मागे पडला.आर्सेनलच्या जेतेपदात त्यांचा भक्कम बचाव निर्णायक ठरला. आर्सेनलने प्रीमियर लीगच्या या हंगामात ३७ पैकी १९ सामन्यांत प्रतिस्पध्र्यांना एकही गोल करू दिला नाही.
त्यांनी आठ सामने १-० अशा फरकाने जिंकले. तसेच कॉर्नर किकच्या साहाय्याने आर्सेनलने १८ गोल नोंदवले. इंग्लिश प्रीमियर लीगमधील संघासाठी हा विक्रम ठरला. आर्सेनलने ३७ सामन्यांत २५ विजय नोंदवले, तर मँचेस्टर सिटीला २३ सामनेच जिंकता आले. हाच दोन संघांतील मुख्य फरक ठरला.
खेळाडू, चाहत्यांचा जल्लोष आर्सेनलच्या खेळाडूंचे मंगळवारी सराव सत्र झाले. त्यानंतर सर्व खेळाडू, प्रशिक्षकांचा चमू आणि आर्सेनल क्लबसाठी काम करणारे अन्य सर्व कर्मचारी यांनी एकत्रितपणे मँचेस्टर सिटी व बॉर्नमथ यांच्यातील सामना पाहिला.
सिटीला हा सामना जिंकण्यात अपयश आल्याने आर्सेनलचे प्रीमियर लीग जेतेपद निश्चित झाले. त्यानंतर या सर्वांनी एकच जल्लोष केला. सर्व खेळाडूंनी समाजमाध्यमांवर विशेष पोस्टही केली. आर्सेनलचा मध्यरक्षक एबेरेची एझेने स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता ‘इन्स्टाग्राम’वर जल्लोषाचे छायाचित्र टाकले. तसेच आर्सेनलच्या चाहत्यांनी लंडनच्या रस्त्यांवर उतरत जेतेपदाचा आनंद साजरा केला. हा जल्लोष रात्रभर सुरू राहिल्याचे वृत्त ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी दिले.
पंतप्रधानांकडून अभिनंदन
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी प्रीमियर लीग विजेत्या आर्सेनल संघाचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे ते आर्सेनल संघाचे चाहते आहेत. ‘‘आर्सेनलची २२ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. आम्ही अखेर योग्य ठिकाणी पोहोचलो. प्रीमियर लीग विजेते,’’ असा संदेश स्टार्मर यांनी लिहिला.
