Arshdeep Singh R Ashwin Cricket News: भारतीय संघ सध्या युरोप दौऱ्यानंतर विश्रांती घेत आहे. यादरम्यान खेळाडू विविध लीग स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. तर विश्रांतीनंतर १५ ऑगस्टपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पोडकास्टसाठी हजेरी लावली होती आणि यामध्ये बोलताना त्याने माजी गोलंदाज आर अश्विनची माफी मागितली. यामागचं कारणही त्याने लगेच सांगितलं.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारतातील सर्वोत्तम पाच गोलंदाजांची निवड करताना अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला पाचव्या स्थानावर ठेवल्यानंतर त्यांची माफी मागितली. इतकंच नाही, तर याबद्दल आपण अश्विनला वैयक्तिकरित्या मेसेज करणार असल्याचंही त्याने सांगितलं. अर्शदीपने आपल्या यादीत भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश केला.

कृष्णांक अत्रेय यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अर्शदीप म्हणाला, “भुवी भाऊ माझ्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, कारण तो माझा वैयक्तिक आवडता गोलंदाज आहे. त्यामुळे मी थोडासा पक्षपाती आहे. दुसऱ्या क्रमांकावर मी शमी भाईला ठेवेन. कोणत्याही खेळपट्टीवर चेंडू सीम करण्याची त्यांची क्षमता अप्रतिम आहे. त्यानंतर कुलदीप यादव, कारण डावखुरा ‘चायनामन’ गोलंदाज ही अतिशय दुर्मिळ कला आहे. चौथ्या क्रमांकावर युझी भाऊ आहेत. आम्ही पंजाब संघाकडून एकत्र खेळलो आहोत आणि त्याने अनेक विक्रमही आपल्या नावे केले आहेत. त्याने खूप विकेट्सही घेतल्या आहेत.”

अश्विनला पाचव्या क्रमांकावर ठेवल्यानंतर अर्शदीप म्हणाला, “मला अॅश भाऊंना शेवटच्या स्थानावर ठेवायचं नव्हतं, पण इतर कोणतंही स्थान शिल्लक नव्हतं. तो महान गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये पंजाब संघाकडून खेळताना तोच माझा पहिला कर्णधार होता. सॉरी अॅश भाऊ… मी तुम्हाला पर्सनली मेसेज करेन.”

विशेष म्हणजे, अर्शदीप सिंगला आयपीएल २०१९ च्या लिलावात पंजाब किंग्जने (त्यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाब) २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात घेतलं होतं. त्यावेळेस रविचंद्रन अश्विन २०१८ आणि २०१९ या हंगामात पंजाब संघाचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वाखालीच अर्शदीपने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली.

अर्शदीप सिंगने २०१९ च्या आयपीएल हंगामात रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली केवळ तीन सामने खेळले होते. त्यानंतर आयपीएल २०२० आणि २०२१ हंगामासाठी अश्विन दिल्ली कॅपिटल्समध्ये दाखल झाला, तर अर्शदीपने आपल्या पदार्पणापासून आजपर्यंत पंजाब किंग्जचं प्रतिनिधित्व कायम ठेवलं आहे.