Arshdeep Singh Record in IPL 2026: वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याने पॉवरप्लेमध्ये रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांना सलग चेंडूंवर बाद करून मुंबई इंडियन्सचं कंबरडे मोडलं. अर्शदीप सिंगने आपल्या पहिल्या षटकात केवळ एक धाव दिली, तर दुसऱ्या षटकात त्याने सलग दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेतल्या. यासह अर्शदीपने मोठा विक्रम केला आहे.

अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रायन रिकल्टनला आणि पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवला बाद केलं. सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर झेलबाद झाला. आपल्या भेदक गोलंदाजीदरम्यान अर्शदीप सिंगने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. यासह अर्शदीप पंजाब किंग्ससाठी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला.

अर्शदीप सिंगने रायन रिकल्टनला बाद करून आपला १०० वा आयपीएल बळी नोंदवला. तो आयपीएलमध्ये १०० बळी घेणारा पाचवा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि पंजाबसाठी १०० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. अर्शदीप सिंगने २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं, जेव्हा पंजाबने त्याला केवळ २० लाख रुपयांना विकत घेतलं होतं. त्यानंतर त्याने आपल्या प्रभावी आयपीएल कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले.

अर्शदीप सिंग गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. पॉवरप्लेमधील विकेट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या अर्शदीपने गेल्या १० डावांमध्ये पॉवरप्लेमध्ये एकही विकेट घेतलेली नाही, हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. आता, मुंबई इंडियन्सविरुद्ध, तब्बल २१.१ षटकांनंतर त्याने आयपीएलच्या पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स घेत पुनरागमन केलं आहे.

अर्शदीप सिंगने आपल्या छोट्या कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय कामगिरी केल्या आहेत. आयपीएल व्यतिरिक्त, त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० हून अधिक बळी घेतले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तो टी-२० विश्वचषकात भारतासाठी दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याला ‘आयसीसी टी-२० वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू’ म्हणूनही गौरविण्यात आले आहे.

आयपीएलमध्ये १०० पेक्षा जास्त बळी घेणारे डावखुरे वेगवान गोलंदाज

१४४ – ट्रेंट बोल्ट
११४ – जयदेव उनाडकट<br>१०६ – आशिष नेहरा
१०२ – झहीर खान
१०१* – अर्शदीप सिंग</p>