IND vs NZ, Arshdeep Singh Daryl Mitchell Fight Video: भारताने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विक्रमी धावसंख्या उभारली. टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला विजयासाठी २५६ धावांचं डोंगराएवढं मोठं लक्ष्य दिलं आहे. पण भारताच्या गोलंदाजांनी मात्र न्यूझीलंडच्या टॉप फलंदाजी फळीला झटपट गुंडाळलं आणि विजयाच्या दिशेने अग्रेसर झाले. यादरम्यान अर्शदीप सिंग व डॅरिल मिचेल यांच्यात मैदानावर वाद झाला. पण यानंतर सूर्यकुमार यादवच्या कृतीने मात्र सर्वांचं मन जिंकलं.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांचां डोंगर उभारला. इशान किशन, संजू सॅमसन व अभिषेक शर्मा या त्रिकुटाने अर्धशतक झळकावत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यानंतर अखेरच्या षटकात शिवम दुबेने चौकार-षटकारांची आतिषबाजी करत संघाला पुन्हा एकदा २५० चा आकडा पार करून दिला. भारताने उभारलेली टी-२० विश्वचषकातील ही सर्वात मोठी धावसंख्या होती. यानंतर न्यूझीलंडच्या डावात भारताच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट सुरूवात केली आणि किवी संघाच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं आहे.

अर्शदीप-मिचेलमध्ये कशावरून झाला वाद?

अर्शदीप सिंग सामन्यातील ११वं षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर डॅरिल मिचेलने षटकार खेचला. यानंतर पाचव्या चेंडूवर अर्शदीपने टाकलेला चेंडू मिचेलने अर्शदीपच्या दिशेने खेळला आणि स्टंप सोडून लांब होता. तितक्यात अर्शदीपने चेंडू स्टंपवर मारला, हे पाहताच मिचेल लगेच त्याची बॅट मैदानावर ठेवण्यासाठी पुढे आला आणि त्यामुळे अर्शदीपने मारलेला चेंडू मिचेलच्या मांडीला लागला.

मिचेलला चेंडू लागताच तो वैतागला आणि अर्शदीपने तितक्यात चेहरा फिरवला. संतापलेला मिचेल अर्शदीपच्या दिशेने मागून हातवारे करत चालत आला. पंचांकडेही त्याने मोठ्याने ओरडत तक्रार केली. पण अर्शदीप मात्र मागे न पाहता पुढे चालत गेला. त्यानंतर पुढचा चेंडू तो खेळला.

अर्शदीपचं षटक संपल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव डॅरिल मिचेलजवळ गेला आणि त्याने हात मिळवत मिचेलची समजूत काढली. सूर्याच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. यानंतर अर्शदीप सिंगनेही मिचेलची भेट घेतली आणि वाद मिटवला. मिचेलने देखील अर्शदीप व सूर्याचं म्हणणं ऐकत राग सोडला. या क्षणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

भारताच्या विजयानंतर अर्शदीप सिंगने धावत जाऊन आधी डॅरिल मिचेलची भेट घेतली आणि त्याची माफी मागितली. तर मिचेलने देखील समजूतदारपणा दाखवला. अर्शदीपच्या या खेळभावनेचं कौतुक केलं जात आहे.