टी२० वर्ल्डकप फायनलच्या लढतीत न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेलच्या दिशेने चेंडू फेकल्याप्रकरणी भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. आयसीसी कोड ऑफ कंडक्ट लेव्हल१ कलमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी अर्शदीपवर ही कारवाई करण्यात येणार आहे. त्याच्या मानधनातून १५ टक्के दंड म्हणून कापून घेण्यात येणार आहे.

आयसीसी कोड ऑफ कंडक्ट आर्टिकल २.९ नुसार खेळाडूने अन्य खेळाडूच्या शरीराचा वेध घेईल अशा रीतीने चेंडू फेकणं उल्लंघन मानलं जातं.

अर्शदीपने ११व्या षटकादरम्यान न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेलच्या दिशेने चेंडू फेकला होता. याप्रकारामुळे चिडलेल्या मिचेलने अर्शदीपला सुनावलं. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने तात्काळ मिचेलशी संवाद साधला. पंच रे एलिंगवर्थ यांनी अर्शदीपला समज दिली. त्यानंतर अर्शदीपने मिचेलशी हस्तांदोलन केले. समना संपल्यानंतर अर्शदीपने मिचेलची भेट घेतली. रिव्हर्स स्विंगमुळे चेडू मिचेलच्या दिशेने गेला. त्याला अपाय करण्याचा कोणताही हेतू नव्हता. यामुळे जाऊन मिचेलची माफी मागितली असं अर्शदीपने सांगितलं. अर्शदीपने माफी मागितल्यानंतरही सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी याप्रकरणाची दखल घेत दंडाची कारवाई केली आहे.

अर्शदीपने आधीच मिचेलची माफी मागितली असल्यामुळे सामनाधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी झाली नाही. लेव्हल१ नियमांचं उल्लंघन केल्यास खेळाडूला समज देण्यात येते. निम्नतम दंड ठोठावण्यात येतो.

दरम्यान भारतीय संघाने फायनलमध्ये २५५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडचा डाव १५९ धावांतच आटोपला. अर्शदीपने स्पर्धेत ८ सामन्यात ९ विकेट्स पटकावल्या.