भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका संपली आहे. भारताने या मालिकेत ४ सामने जिंकत ४-१च्या फरकाने मालिका आपल्या नावे केली आहे. या मालिकेत टीम इंडियाने आपला दबदबा कायम राखला. प्रत्येक सामन्यात संघातील वेगवेगळ्या खेळाडूंनी पुढे येत मॅचविनिंग खेळी केल्या. या सामन्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर मेडल कोणाला मिळालं, जाणून घेऊया.
भारतीय संघाने पहिला टी-२० सामना ४८ धावांनी जिंकला. तर दुसरा टी-२० सामना भारताने ७ विकेट्सने आपल्या नावे केला. तर तिसरा सामनाही टीम इंडियाने ८ विकेट्सने जिंकत मालिका ३-०च्या फरकाने आपल्या नावे केली. त्यानंतर चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने पुनरागमन करत ५० धावांनी विजय मिळवला. तर पाचवा सामना टीम इंडियाने ४६ धावांनी जिंकत मालिकेत ४-१ असा विजय मिळवला.
या मालिकेत कर्णधार सूर्यकुमार यादव, इशान किशन, अभिषेक शर्मा सारख्या खेळाडूंनी शानदार फलंदाजी केली तर वरुण, बुमराह, अर्शदीप सारख्या गोलंदाजांनी त्यांच्या गोलंदाजीने प्रभावित केलं. कर्णधार सूर्यकुमारने सर्वाधिक धावा करत मालिकावीर ठरला. तर इशानने एक शानदार खेळी केली आणि अभिषेकनेही प्रभावी फलंदाजी केली.
अर्शदीप सिंग हा या सामन्याचा इम्पॅक्ट प्लेअर ठरला. अर्शदीप सिंगने टी-२० मालिकेत सर्वाधिक ८ विकेट्स घेतल्या. तर अखेरच्या टी-२० सामन्यात त्याने पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. अर्शदीप सिंगला भारतीय संघाचा ट्रेनिंग असिस्टंट असलेल्या नुवानने मेडल दिलं. अर्शदीपने मेडल घेतल्यानंतर आभार मानले आणि अशीच कामगिरी करत राहणार असल्याचं त्याने सांगितलं.
टी-२० मालिकेत न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर, भारतीय संघ आता ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ साठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. या स्पर्धेत अर्शदीप सिंग भारतासाठी एक महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो आणि तो बुमराहसह तो खेळताना संघाची गोलंदाजी बाजू अधिक भक्कम होऊ शकते.

