ऋषिकेश बामणे

‘‘मैदानावर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने असून तू इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी मैदानावर येऊ नकोस. तुला या सामन्यासाठी वगळण्यात आले आहे,’’ हे प्रशिक्षक रमेश पोवार यांचे शब्द भारतीय महिला क्रिकेट संघाची गेली १९ वर्षे अविरत सेवा करणाऱ्या मिताली राजसाठी धक्कादायक होते. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या महिला विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेला आठवडाही होत नाही, तोच महिला क्रिकेटमध्ये मानापमान नाटय़ रंगले. भारतीय महिला संघातील सर्वात अनुभवी खेळाडू मितालीने पोवार यांनी आपला अपमान केल्याचे सांगून त्यांच्यावर तोफ डागली. मात्र महिला क्रिकेटला गेल्या वर्षभरात मिळालेल्या प्रकाशझोतामुळे मितालीच्या डोक्यात अहंकाराची हवा तर गेली नाही ना?.. की तिला प्रशिक्षकांच्या सक्तीचा बळी व्हावे लागले? यांसारखे अनेक प्रश्न सध्या मिताली राज आणि रमेश पोवार यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे उपस्थित होत आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्याआधी नेमके असे काय घडले, जेणेकरून पोवार यांनी मितालीला वगळण्याचा निर्णय घेतला, हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. मात्र या घटनेमुळे संघातील खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम झाला असून त्यांच्यातील एकजुटीच्या भावनेला खीळ बसली आहे. डायना एडल्जी, नीलिमा जोगळेकर, शुभांगी कुलकर्णी, अंजूम चोप्रा यांच्यासारख्या नामांकित खेळाडूंचा वारसा लाभलेल्या महिला क्रिकेटला गेल्या वर्षभरात अनेक सोनेरी स्वप्ने पडू लागली. मितालीच्या रूपाने नव्या पिढीला क्रिकेटकडे वळवण्यासाठी एक नायिका मिळाली. असंख्य आव्हानांचा सामना करत महिला क्रिकेटचा चेहरामोहरा पालटण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली. पुरुषांप्रमाणेच महिला क्रिकेटलाही आता चांगल्या प्रमाणात प्रसिद्धी मिळू लागली आहे, या स्थित्यंतरात मितालीचाही सिंहाचा वाटा आहे.

महिला क्रिकेटला चाहत्यांच्या मनात रुजण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) एकरूप झाली व थोडय़ा प्रमाणात का होईना, महिला क्रिकेटचे सामने दूरचित्रवाणीवर प्रदर्शित होऊ लागले. या वेळीच भारताला मितालीसारख्या हिऱ्याची ओळख झाली. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी भारताचे नेतृत्व करणाऱ्या मितालीने २००५मध्ये संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत नेले होते. मात्र दुर्दैवाने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

त्यानंतर एका तपाच्या अंतराने २०१७ हे महिला क्रिकेटसाठी सोनेरी वर्ष ठरले. इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात मितालीसह झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, पूनम राऊत या तिच्या रणरागिण्यांनी केलेल्या खेळाचे संपूर्ण जगभर कौतुक झाले. येथेही इंग्लंडविरुद्धच्या अंतिम फेरीत भारताच्या पदरी निराशाच पडली, मात्र महिला संघाच्या सुवर्णअध्यायाच्या काळाला खरी सुरुवात झाली. माध्यमांकडून झालेले कौतुक, स्वत:ला लाभलेली वेगळी ओळख यामुळे महिला क्रिकेटचा ध्वज संपूर्ण भारतभर डौलाने फडकला. मात्र त्या विश्वचषकानंतरसुद्धा वाद निर्माण झाला होता. प्रशिक्षक तुषार आरोठे यांनादेखील अतिशिस्तबद्ध वागणूक व सरावाची सक्ती केल्याने संघातील खेळाडूंच्या सांगण्यावरूनच प्रशिक्षकपदावरून काढण्यात आले. आरोठेंपूर्वी प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या पूर्णिमा राव यांना तर एकदा प्रशिक्षकपदावरून काढून टाकून पुन्हा रुजू करण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षभरात जवळपास तीन प्रशिक्षकांशी जुळवून घेणे खेळाडूंना कठीण जाणे, हे संशयास्पद आहे.

या वादांना सुरुवात भारतीय महिला क्रिकेटच्या चांगल्या दिवसांनंतरच झाली. महिला क्रिकेटपटूंनाही आता श्रेणीनिहाय मानधन मिळू लागले आहे. ‘दुख भरे दिन बिते रे भया..’ या गीताला साजेसे सुखद दिवस सुरू झाले, तेव्हापासून खेळाडूंचे अहंकार खेळापेक्षा मोठे झाले. समस्येचा उगम हा येथूनच झाला. तूर्तास तरी हे मानापमान नाटय़ चर्चेत आहे. नित्य नवे खुलासे, आरोप-प्रत्यारोप यातून स्वत:ला सिद्ध करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करून भारतीय महिला क्रिकेटची घडी नीट लावून भविष्याच्या दृष्टीने दिशा देण्याची नितांत आवश्यकता आहे.

पुरुषांच्या क्रिकेटमध्येही प्रशिक्षक-खेळाडू वाद

भारतीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षकांशी खेळाडूंचे मतभेद हे पुरुषांच्या क्रिकेटसाठी नवे नाहीत. २००७मध्ये वेस्ट इंडिज येथे झालेल्या विश्वचषकात प्रशिक्षक ग्रेग चॅपेल व संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये असंख्य वाद झाले होते. याचाच परिणाम म्हणून भारताला त्या विश्वचषकात साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्याशिवाय चॅपेल यांचीही प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यामुळे विराट कोहली व अनिल कुंबळे यांच्यातदेखील वाद असल्याचे उघडकीस आले. अखेरीस कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत या वादावर पडदा टाकला. मात्र खेळाडू व प्रशिक्षकांमधील मतभेदांची शिक्षा फक्त प्रशिक्षकालाच भोगावी लागत आहे, असे यावरून दिसून येते.

rushikesh.bamne@expressindia.com