ऋषिकेश बामणे rushikesh.bamne@expressindia.com

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, २०१६. स्थळ – बेंगळूरू. बांगलादेशविरुद्धच्या साखळी लढतीत भारताला अखेरच्या सहा चेंडूंत ११ धावांचा बचाव करण्याची आवश्यकता असताना कर्णधार महेंद्रसिंह धोनीने युवा हार्दिक पंडय़ाकडे चेंडू सोपवला. फलंदाजीत तोपर्यंत सातत्याने चमक दाखवणाऱ्या हार्दिकने त्या दिवशी धोनीसह तमाम देशवासीयांचा विश्वास सार्थ ठरवत भारताला गोलंदाजीच्या बळावर अशक्यप्राय विजय मिळवून दिला. बांगलादेशच्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी तसेच धोनीच्या कल्पकतेने हार्दिकचे कार्य अधिक सोपे केले.  मात्र येथूनच उदय झाला तो अष्टपैलू हार्दिकचा.

पाच वर्षांपूर्वीचा हाच अष्टपैलू हार्दिक आता दिसेनासा झाला आहे. हरवलेला सूर, गोलंदाजी करताना येणाऱ्या समस्या आणि १०० टक्के तंदुरुस्ती राखण्यात आलेले अपयश, या बाबींमुळे हार्दिकला भारताच्या संघातून वगळण्यात आले. त्याच्या देहबोलीतून तसेच मैदानातील वावरावरून त्याचे क्रिकेटकडे फारसे लक्ष नसल्याचे जाणवत असल्याने अनेकांच्या तो नापसंतीस उतरला आहे. २८ वर्षीय हार्दिकला आता बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्तीवर मेहनत घेण्याबरोबरच स्थानिक स्पर्धामध्ये गोलंदाजीत कमाल दाखवावी लागेल. अन्यथा फलंदाजीच्या बळावर त्याला भारतीय संघात स्थान मिळणे कठीणच दिसते.

भारताला १९८३ मध्ये विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिलदेव आजवरचे आपल्याला लाभलेले सर्वोत्तम अष्टपैलू, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हार्दिकने ज्या वेळी कारकीर्दीला प्रारंभ केला, तेव्हा त्याचीही तुलना कपिल यांच्याशी करण्यात आली. २०१७च्या चॅम्पियन्स करंडक स्पध्रेतील पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम फेरीत साकारलेली जिगरबाज खेळी, श्रीलंकेत नोंदवलेले पहिले कसोटी शतक, इंग्लंडमध्ये २०१८च्या कसोटी दौऱ्यात मिळवलेले पाच बळी यांसारख्या उल्लेखनीय प्रदर्शनामुळे हार्दिक परिपूर्णतेच्या वाटेने निघाला. त्यामुळे प्रदीर्घ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताला प्रतिभावान अष्टपैलू गवसल्याची खात्री पटली. परंतु आताच्या हार्दिकला अष्टपैलू म्हणावे का, असा सवाल कपिल यांनीच काही दिवसांपूर्वी केला. हार्दिक गोलंदाजी करत नसल्याने त्यांनी उपस्थित केलेली ही शंका खरेच विचार करण्यायोग्य आहे.

संयुक्त अरब अमिरातीत २०१८ मध्ये झालेला आशिया चषकातील एका लढतीत हार्दिक गोलंदाजी करताना खाली कोसळला आणि येथून त्याच्या दुखापतींचे सत्र सुरू झाले. पाठीच्या दुखापतीतून सावरत हार्दिकने काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर संघात पुनरागमन केले. २०१९च्या सुरुवातीला इंग्रजी कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह मत व्यक्त केल्यामुळे हार्दिक निलंबनाच्या चक्रव्यूहात अडकला. त्यामुळे त्याची प्रतिमासुद्धा डागाळली गेली. तरीही जून महिन्यात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले. त्या वेळी हार्दिकने स्वत:च्या कामगिरीत आणि व्यक्तिमत्त्वातही विकास झाल्याचे दाखवून दिले. २०२० मध्ये हार्दिकच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. त्याने २०२०, २०२१ या दोन्ही वर्षांच्या आयपीएलमध्ये एकदाही गोलंदाजी केली नाही. महिन्याभरापूर्वी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात हार्दिकने काही लढतींमध्ये चेंडू हाताळला. परंतु तो पूर्ण लयीत गोलंदाजी करताना दिसला नाही. तसेच फलंदाजीत त्याच्यासह अन्य फलंदाजही छाप पाडण्यात अपयशी ठरल्याने भारताला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अष्टपैलू हार्दिकचा आता अस्त झाला आहे का, असा प्रश्न आपसुकच निर्माण होतो. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वचषक रंगणार असून २०२३ मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. तोपर्यंत हार्दिक शिस्त आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर अष्टपैलू म्हणून संघातील स्थान पुन्हा काबीज करणार की अफाट कौशल्य असूनही गांभीर्य नसल्याने त्याचीही काही माजी क्रिकेटपटूंसारखी अवस्था होणार, याचे उत्तर लवकरच मिळेल.

चौकडीचा पर्याय

हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त होऊन गोलंदाजीला कधी प्रारंभ करेल, याविषयी कोणीही ठामपणे भाष्य करू शकत नाही. त्यामुळे सध्या हार्दिकसारखाच मध्यमगती गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूचा शोध सुरू झाला आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत वेंकटेश अय्यरला भारताने संधी दिली. त्याने दोन्ही विभागांत संमिश्र स्वरुपाची कामगिरी केली. तसेच मुंबईकर शिवम दुबेलासुद्धा पुन्हा संघात सामील करून एक संधी देता येऊ शकते. याव्यतिरिक्त शार्दूल ठाकूर आणि दीपक चहर यांच्या स्वरूपातही अष्टपैलूचे पर्याय उपलब्ध आहेत. विदेशी खेळपट्टय़ांवर होणाऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाजी आणि सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलूची संघात गरज असते. अशा वेळी शार्दूलला प्रथम पसंती मिळू शकते. मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी मात्र संघात फार चुरस असल्याने येत्या काळात कोण हार्दिकची जागा घेणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.