scorecardresearch

लढवय्या

सचिन.. सचिन..’ असा अविरत जयघोष विराटसाठी होत नाही.

डी’व्हिलियर्स

सचिन तेंडुलकरचे सर्व विश्वविक्रम एखादा भारतीय क्रिकेटपटूच मोडेल, असे भाकीत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी काही वर्षांपूर्वी केले होते. त्या वेळी ऐन बहरात असलेल्या विराट कोहलीकडून गावस्कर यांना मोठय़ा आशा होत्या, पण विराटची क्रिकेट कारकीर्द खेळापेक्षा अन्य कारणांसाठीच अधिक गाजते आहे. ‘सचिन.. सचिन..’ असा अविरत जयघोष विराटसाठी होत नाही. त्याच्या फटक्यांची नजाकत चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत नाही, पण सचिननंतर एक दक्षिण आफ्रिकेचा अवलिया क्रिकेटरसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करू लागला आहे. ‘एबीडी.. एबीडी..’ ही आद्याक्षरे त्याच्या मैदानावरील अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत. तो एखाद्या तुफानाप्रमाणे फलंदाजी करतो. गोलंदाजांवर आपली दहशत निर्माण करणारा ‘प्रीटोरियाचा राजपुत्र’ म्हणजे अब्राहम बेंजामीन डी’व्हिलियर्स. मैदानावर चौफेर फटकेबाजी करण्याच्या त्याच्या तंत्रामुळे ‘मिस्टर ३६०’ आणि अद्वितीय कामगिरीच्या बळावर ‘सुपरमॅन’ अशी काही टोपणनावेसुद्धा त्याने धारण केली आहेत.
एबीचा जन्म १७ फेब्रुवारी १९८४ ला झाला. त्यामुळे १७ याच क्रमांकावर त्याची मर्जी बसली आणि तोच पुढे त्याने जर्सी क्रमांक ठेवला. वडील व्यवसायाने डॉक्टर. त्यांच्याच पावलांवर पावले टाकत एबीनेसुद्धा डॉक्टर व्हायचा निर्धार केला होता; परंतु क्रिकेटच्या प्रेमाने त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न बाजूला राहिले. एबी प्रिटोरियाच्या आफ्रिकन्स हायस्कूलचा विद्यार्थी; परंतु विद्यार्थीदशेतच त्याच्यातील असामान्य प्रतिभा दिसून आली. गोल्फ, टेनिस, हॉकी, रग्बी, फुटबॉल, स्क्व्ॉश, जलतरण, आदी खेळांमध्ये त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले. क्रीडाप्रेमी डी’व्हिलियर्स कुटुंबीयाने घरासमोरील विस्तीर्ण अंगणाचे क्रिकेट मैदानात छान रूपांतर केले होते. याच ठिकाणी भावंडे आणि मित्रांसोबत त्याचा क्रिकेटचा डाव रंगायचा. जॅन आणि वेसेल्स ही त्याची दोन मोठी भावंडे. वयाने अनुक्रमे नऊ आणि सहा वर्षांनी मोठी, पण एखादा सामना असेल, तर मध्यरात्री खेळपट्टीवर रोलर फिरवण्याची जबाबदारी अर्थातच डी’व्हिलियर्सवर पडायची. मग सामन्यातही त्याला पूर्ण दिवस क्षेत्ररक्षण करावे लागायचे. ‘दादा’ मंडळी फलंदाजी आणि गोलंदाजीचा आनंद लुटायची. दिवसाचा खेळ संपत असताना डी’व्हिलियर्सला काही अंडरआर्म चेंडूंचा ते सराव द्यायचे.
बालपणी डी’व्हिलियर्स खेळत असलेल्या खेळांच्या यादीत क्रिकेटचा क्रमांक अतिशय खालचा होता. सहाव्या वर्षी टेनिसमध्ये त्याची कामगिरी बहरू लागली. त्याचा पहिलाच सामना रंगला तो इझाक व्हान डर मर्वेशी. जो कालांतराने दक्षिण आफ्रिकेचा अव्वल व्यावसायिक टेनिसपटू झाला. आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा प्रतिस्पध्र्याशीही त्याने आरामात विजय मिळवले. तासन्तास तो ग्रँड स्लॅम टेनिस स्पध्रेचे सामने पाहायचा. विम्बल्डन विजेतेपद आणि जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान मिळवण्याचे स्वप्न डी’व्हिलियर्सने जोपासले होते. मात्र काही वर्षांत टेनिसची जागा क्रिकेट आणि रग्बीने घेतली.
विसाव्या वर्षी डी’व्हिलियर्सने कसोटी पदार्पण केले. सलामीवीर फलंदाज म्हणून तो पहिली कसोटी खेळला, परंतु दुसऱ्या कसोटीत त्याचा फलंदाजीचा क्रम खाली आला. याशिवाय यष्टिरक्षणाची जबाबदारीही त्याच्याकडे सोपवण्यात आली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून सामना वाचवणारे अर्धशतक त्याने साकारले. मग अखेरच्या कसोटीत पुन्हा आघाडीच्या फळीत त्याला स्थान मिळाले. कॅरेबियन दौऱ्यात डी’व्हिलियर्सने १७८ धावांची शानदार खेळी साकारली आणि दक्षिण आफ्रिकेला मालिका जिंकून दिली. मात्र २००५च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याची कामगिरी समाधानकारक झाली नाही. शेन वॉर्नचा सहज सामना करूनही सहा डावांत त्याच्या खात्यावर फक्त १५२ धावा जमा होत्या. २००८मध्ये डी’व्हिलियर्सने नाबाद २१७ धावांची संस्मरणीय खेळी साकारली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने भारताविरुद्ध झळकावलेले ते पहिले द्विशतक होते. त्यानंतर २०१०-११मध्ये अबू धाबी येथे पाकिस्तानविरुद्ध त्याने नाबाद २७८ धावा केल्या.
आता डी’व्हिलियर्स बंगळुरूला भारताविरुद्ध आपल्या कसोटी कारकीर्दीतील शंभरावा सामना खेळत आहे. डी’व्हिलियर्सने ९९ कसोटी सामन्यांत ७७७२ आणि १९५ एकदिवसीय सामन्यांत ८४०३ धावा केल्या आहेत. याशिवाय २१ कसोटी आणि २३ एकदिवसीय शतके त्याने साकारली आहेत. सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या सार्वकालीन फलंदाजांमध्ये डी’व्हिलियर्स सहाव्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकन फलंदाजांमध्ये तो अग्रेसर आहे. त्यामुळेच ३१ वर्षीय डी’व्हिलियर्सची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. त्याने या वर्षी ऑस्ट्रेलियातील विश्वचषकातही एखाद्या ध्रुवताऱ्याप्रमाणे सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
विविध खेळांमधील कौशल्यामुळे डी’व्हिलियर्सचे क्रिकेट अधिक समृद्ध झाले आहे. गोलंदाजांना धडकी भरवणारी फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजीमुळे कधी त्याची जॅक कॅलिसशी तुलना होतेय. यष्टिरक्षण किंवा पॉइंटच्या मोक्याच्या ठिकाणचे क्षेत्ररक्षण जॉन्टी ऱ्होड्सप्रमाणेच अफलातून असते. त्यामुळेच डी’व्हिलियर्सने सचिनचे विक्रम मोडून गावस्करचे शब्द खोटे ठरवल्यास क्रिकेटजगताला मुळीच आश्चर्य वाटणार नाही.
prashant.keni@expressindia.com

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article on ab de villiers

ताज्या बातम्या