डॉ. प्रकाश परांजपे

‘‘आबा, त्या डावात एक्क्याला बगल दिली असती तर भातखंडे काकांचा ठेका वटला असता,’’ दिवे बंद होतानाच छोटू ओरडला.

आबा चपापले. ‘‘भातखंडेला काय झालं?’’ त्यांनी विचारलं.

‘‘काही नाही हो, मी परवाच्या डावाची गोष्ट करतोय. त्या डावात नाही का? भातखंडे काकांनी डाव वाटून १ किलवर (१२-१४ काउंट्स ) ची बोली दिली. मेननकाका १ बिहू (१२+काउंट्स) बोलले. माझ्याकडे भिकार डाव होता. आपण डावात फक्त पास बोलत होतो. भातखंडे काकांनी २ बिहूची बोली दिली कारण त्यांच्याकडे ५ पानी पंथ नव्हता. मग ३ चौकट-३ बदाम-४ बदाम अशा बोली लागल्या आणि भातखंडे काका ४ बदामचे ठेकेदार झाले. मेनन काकांनी पानं खाली पसरल्यानंतर मी विचारलं. पण की त्यांनी चारच पान असताना ३ चौकटची बोली कशी लावली. त्यांनी सांगितलं की पाच पानी चौकट पंथ आणि १२ वर काउंट्स असते तर त्यांनी १ बिहूच्या बोलीऐवजी आधीच दोन चौकट ची बोली लावली असती. त्यांची ही पद्धत चांगली आहे ना आबा?’’

आबांची भुवई जरा वर गेली. ‘‘माझ्याकडे चौकटची एक्का राजा राणी अशी फौज होती तोच डाव म्हणतोयस ना?’’ आबांनी जरा त्रासूनच विचारलं.

‘‘बरोबर आहे आबा. तुमच्या एक्का राजाचे दोन दस्त झाले, पण राणीला भातखंडे काकांनी हुकुमाच्या सत्तीने मारलं. चौथ्या दस्ताला ते बदामाचा राजा खेळले. मी एक्का घेतला आणि चौकट गुल्लय़ा लावला आणि भातखंडे काका एकदम हादरले. त्यांना वाटलं होतं की चौकट गुल्लय़ा तुमच्याकडे असेल बहुतेक. चांगलाच घाम फुटला होता त्यांना. तुमच्याकडे बदामचे दश्शा-नश्श्या उरले होते. त्यांनी मग बराच वेळ विचार केला. मेनन काकांना पण सिगारेटची आठवण झाली असावी. त्यांनी दोनदा खिशात हात घालून चाचपून बघितलं. पण त्यांनी आता सोडलीय सिगारेट.’’

‘‘तुला भलत्या चौकशा कशाला पाहिजेत छोटू? भातखंडेने बदाम राणीने मारती घेतली. मी इस्पिक दुरी जाळली. माझ्या हातात बदामचे दश्शा-नश्श्या अजूनही शाबूत होते. भातखंडेने बदाम गुलाम वाजवला त्यावर मी नश्श्या टाकला पण माझ्या दश्शाला एक दस्त द्यवाच लागला त्याला. दश्शाला  बढती मिळालीअसं म्हणतात इथे. कळलं का छोटू? पण मग इथं बगलेचा काय संबंध?’’

‘‘बढती मिळाली दश्शाला? बरोबर आहे आबा. पण भातखंडे काका काय लेख वाचत नाहीत ना, त्यामुळे त्यांना एक्कय़ाला बगल देता आली नाही.’’

‘‘‘अहो, त्यांनी चौकट राणीची मारती  घेतल्यानंतर जर इस्पिक खेळून ते पश्चिमेच्या हातात दस्त जिंकले असते आणि तिथून त्यांनी एक छोटं बदामाचं पान  लावलं असतं तर त्यांना एक्कय़ाला बगल देता आली असती ना? म्हणजे असं, की मी एक्का खेळलो कि त्यांना बदाम अठ्ठी खेळता आली असती आणि त्यांचे राजा राणी वाचले असते. मग चौकट  गुलाम त्यांना राजाने मारता आला असता, आणि मग बदाम राणीवर तुमचा नश्श्या पडला असता आणि पुन्हा इस्पिक राजाने मेनन काकांच्या हातात दस्त जिंकून त्यांना बदाम गुलाम लावता आला असता, तुमचा दश्शा पाडायला. बनला असता त्यांचा ठेका तसा , बरोबर ना?’’

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com