महिला क्रिकेटची प्रगतीकडे वाटचाल?

वर्षभराच्या कालावधीत भारताला विश्वचषकासारख्या तीन प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये अपयशाचा सामना करावा लागला आहे

(संग्रहित छायाचित्र)

तुषार वैती

‘‘आतापर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरीही गाठता आली नव्हती. पण यंदा आम्ही विश्वविजेतेपदापर्यंत येऊन पोहोचलो, याचे समाधान वाटत आहे,’’ ही विश्वचषक गमावल्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरची पहिली प्रतिक्रिया. हरमनप्रीतने भारताच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे वास्तव मांडले असले तरी आपण फक्त उपविजेतेपदावरच समाधान मानणार आहोत का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तुम्ही चांगले खेळलात, तुमचा प्रयत्न चांगला होता, इतकीच प्रतिक्रिया देऊन भारतीय चाहतेही गप्प झाले. पण ऑस्ट्रेलियाने पुरुषांप्रमाणेच महिला क्रिकेटमध्येही आपला दबदबा निर्माण केला आहे, त्यांचे अनुकरण आपण कधी करणार? याची उत्तरे शोधण्याची वेळ आता आली आहे.

वर्षभराच्या कालावधीत भारताला विश्वचषकासारख्या तीन प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये अपयशाचा सामना करावा लागला आहे. हातातोंडाशी आलेला घास भारताने गमावला आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतही भारताला अंतिम फेरीत बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला. आता भारतीय महिलांना ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने धूळ चारली. जवळपास १० महिन्यांत भारताला तीन विश्वचषकांवर पाणी फेरावे लागल्याने आता जागे होण्याची वेळ आली आहे.

संपूर्ण स्पर्धेत शफाली वर्माचा दबदबा पाहायला मिळाला. पण अंतिम फेरीत तिने सोडलेला एलिस पेरीचा झेल भारताला महागात पडला. त्यामुळे भारताच्या पराभवाचे खापर शफालीवर फोडू नये, असे आवाहन हरमनप्रीतने केले. १६ वर्षीय शफालीकडून चूक झाली, हे मान्य आहे. मात्र शफाली आणि पूनम यादव यांच्या कामगिरीच्या बळावरच भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, हे विसरून चालणार नाही. शफालीची बॅट तळपल्यामुळेच भारताला गटसाखळीत अग्रस्थान पटकावता आले होते. खरे पाहता, अव्वल चार फलंदाजांच्या कामगिरीवर भारताची प्रमुख भिस्त होती. त्यापैकी एकटय़ा शफालीने आपली कामगिरी चोखपणे बजावली. जेमिमा रॉड्रिग्जने काही वेळा उपयुक्त खेळी करत भारताच्या विजयात योगदान दिले. पण संघातील सर्वात अनुभवी फलंदाज स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या सपेशल अपयशी ठरल्या. हरमनप्रीतला पाच सामन्यांत फक्त ३० धावा करता आल्या. मानधना तर चार सामन्यांत ४९ धावा करून मायदेशी परतली. मग भारताच्या पराभवास खऱ्या अर्थाने कोण कारणीभूत आहेत, याची कारणमीमांसा करण्याची वेळ आता आली आहे.

भारताच्या मधल्या फळीची कामगिरी हा कायम चिंतेचा विषय राहिला आहे. २०१७च्या एकदिवसीय विश्वचषकात सलामीवीर पूनम राऊतच्या शतकी खेळीनंतरही भारताची मधली फळी कोसळली, त्यामुळे विश्वचषक उंचावण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तोच कित्ता २०२०मध्येही भारताने गिरवला. ट्वेन्टी-२० विश्वचषकाआधीच्या तिरंगी मालिकेतही मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला विजेतेपद मिळवता आले नव्हते. हरमनप्रीत, मानधनाचे अपयश भारताला भोवत आहे. त्याचबरोबर मधल्या फळीत तानिया भाटिया, वेदा कृष्णमूर्ती यासुद्धा अपयशी ठरल्या आहेत. या सर्वाच्या कामगिरीविषयी बोलायला कुणीही तयार नाही. आता याच चुकांमधून शिकण्याची गरज भासू लागली आहे.

फलंदाजांचे अपयश गोलंदाजांनी धुवून काढल्यामुळेच भारताला अंतिम फेरीपर्यंत तरी झेप घेता आली. लेगस्पिनर पूनम यादवने आपल्या फिरकीच्या तालावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नाचवले. त्यामुळे साखळीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सलामीचा सामना भारताला जिंकता आला. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत पूनमने (१० बळी) दुसरे स्थान पटकावले. विशेष म्हणजे भारताला प्रथम फलंदाजी करताना १४०च्या पुढे धावा काढता आल्या नाहीत. पूनम, राधा यादव, शिखा पांडे, दीप्ती शर्मा यांच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे भारताने इतके माफक आव्हान असतानाही विजय मिळवले.

आता भारतीय संघात बदल होण्याची आवश्यकता आहे. कामगिरीत सातत्य हा निकष अनुभवी खेळाडू मिताली राजला लावण्यात आला, तसाच तो आता अन्य खेळाडूंनाही लावायला हवा. कामगिरीच्या आधारावरच संघनिवड करून खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणाचा पुरेसा सराव करवून घेणे गरजेचे आहे, तरच उपांत्य किंवा अंतिम सामन्याचे दडपण भारताला झेलता येईल. भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दाखवून दिले. पण आता दुसऱ्याऐवजी प्रथम क्रमांक मिळवून विश्वविजेतेपदाला गवसणी घालणे, हेच एकमेव लक्ष्य असायला हवे. तरच महिला क्रिकेटची खऱ्या अर्थाने प्रगती झाली, असे म्हणता येईल.

tushar.vaity@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on looking for womens cricket progress abn