प्रशांत केणी

आज माझी गर्जना क्षीण का वाटते आहे? मी तर जंगलचा राजा. पण माझा दरारा संपला तर नाही ना? एक-दोन नव्हे, तर तब्बल ४१ विजेतेपद जिंकली आहेत मुंबईनं. म्हणून माझ्या शिरावरील हा सोनेरी मुकुट शोभून दिसतो. परंतु माझ्या गर्जनेत आणि डरकाळीत माझा रुबाब आज जाणवत का नाही?

महिन्याभरापूर्वी करोना रुग्णांसाठी वानखेडे ताब्यात घेणार अशी चर्चा होती. त्यामुळे मी व्यथित झालोय, असं तुम्हाला वाटेल. परंतु तसं प्रत्यक्षात घडलं असतं, तर ती माझ्याकडून समाजसेवाच घडली असती.. मला खंत माझ्या अस्तित्वाची आहे. माझ्या जागी नवा सिंह आणण्याची योजना आखली जात आहे. हेच मला गेले काही दिवस अश्वत्थाम्याप्रमाणे जर्जर वेदना देत आहे. यासाठी पाच सिंहांची निवडसुद्धा केलीय म्हणे. यापैकी काही सिंहांच्या डोक्यांवर माझ्यासारखे सोनेरी मुकुटसुद्धा नाहीत. उजवा पंजा जेतेपदाच्या ढालीवर, हा पवित्रा मुंबईच्या क्रिकेटला प्रेरणादायी वाटतो. हे इतर सिंहांना जमेल का?

१९३०मध्ये मुंबई (त्यावेळी बॉम्बे) क्रिकेट संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर २९ सप्टेंबर, १९३८ या दिवशी झालेल्या संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ‘ढालीसोबतचा सोनेरी मुकुटधारी लाल सिंह आणि त्याला निळा वेश’ हे बोधचिन्ह म्हणून ‘एमसीए’नं स्वीकारलं. म्हणजे माझं वयोमान ८२ वर्षांचं. बदल हा जीवनाचा स्थायीभावच, म्हणून चक्क मलाच बदलून ही मंडळी काय साधणार आहेत?

सुरुवातीची अनेक वर्षे ‘एमसीए’कडे स्वत:ची जागा नव्हती. त्यामुळे मला खूप वणवण सहन करावी लागली. परंतु १९७३मध्ये क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आणि ‘एमसीए’ यांच्यात मोठा वाद झाला. त्यावेळी ‘सीसीआय’ला धडा शिकवण्याच्या निर्धारानं तत्कालीन अध्यक्ष विजय र्मचट आणि शेषराव वानखेडे यांनी नवं स्टेडियम बांधण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. मग ११ महिने आणि २३ दिवस अशा विक्रमी कालावधीत वानखेडे स्टेडियम उभं राहिलं. त्यावेळी एका प्रवेशद्वारापाशी मी विराजमान होतो. २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेआधी वानखेडेचं नूतनीकरण झालं. त्यावेळच्या कार्यकारिणीनं दिवेचा स्टँड आणि सुनील गावस्कर स्टँडच्या मधील भिंतीवर माझी आणि एका ऐतिहासिक घडय़ाळाची स्थाननिश्चिती केली. तसं माझं तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयातल्या कारभारावरही लक्ष असतं म्हणा.

काही वर्षांपूर्वी वरिष्ठांचं क्रिकेट वगळता अन्य वयोगटांसाठी मुकुटविरहित सिंह असावा, अशी चर्चा झाली. म्हणजे १६ किंवा १४ वर्षांच्या वयोगटाला त्या सिंहाची आयाळ म्हणजे दाढी-मिशा नसाव्यात का, असा सवाल कार्यकारिणीत असलेल्या माजी क्रिकेटपटूनं विचारला होता. पण हा प्रस्ताव चर्चेपुरताच मर्यादित राहिल्यानं माझी हजामत टळली.

अनेक ऐतिहासिक क्षणांचा मी साक्षीदार आहे. १९८४-८५च्या रणजी हंगामात रवी शास्त्रीनं बडोद्याविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारले होते. मग १९८७मध्ये भारताचा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभव झाला होता, ते पाहणे मला कठीण गेलं होतं. २०११मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं विश्वचषक जिंकल्यावर मी गर्जना करीत आनंद साजरा केला होता. त्यानंतर २०१३मध्ये सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना. त्याच्या निरोपाच्या भाषणावेळी मीसुद्धा ढसाढसा रडलो होतो. याशिवाय अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्षणांचा मी जिवंत साक्षीदार आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी इंग्लंडच्या अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिंटॉफनं भारतावरील विजयाचा आनंद जर्सी काढून फडकावत केला होता. ते माझ्या जिव्हारी लागलं होतं. पण सौरव गांगुलीनं लॉर्ड्सवर त्याची परतफेड केली, तेव्हाच माझ्यातील क्रोधाग्नी शांत झाला.

सद्य:स्थितीत मुंबईच्या क्रिकेटला पूर्वीसारखं वैभव राहिलेलं नाही. एके काळी मुंबईचे सहा-सात जण भारतीय संघात असायचे. आता ही संख्या रोडावली आहे. यंदा सलग दुसऱ्यांदा मुंबईचा संघ रणजीच्या साखळीतच गारद झाला, तर २०१५-१६नंतर विजेतेपदही दुर्मीळ झालं आहे. योग्य गुणवत्ता असतानाही मुंबईचं क्रिकेट समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलं आहे. सध्या टाळेबंदीच्या काळात क्रिकेट स्थगित झालं असताना पुढील हंगामाची योग्य आखणी करता येऊ शकते. क्रिकेट सुधारणा समिती, निवड समिती, प्रशिक्षक आणि साहाय्यक मार्गदर्शकांची नेमणूकसुद्धा आता करता येऊ शकते. पण हे गांभीर्यानं करायचं सोडून या मंडळींना मला बदलायची घाई झाली आहे. मला बदलून यश मिळणार असेल, तर ते जरूर करावं! (सारं मन मोकळं झाल्यानं आता सिंह शांत वाटत होता. पण चिंतेच्या लकेरी त्याच्या माथ्यावर कायम होत्या. पुन्हा एक डरकाळी फोडत तो व्यथित झाला.)

prashant.keni@expressindia.com