प्रशांत केणी

जागतिक क्रिकेटवरील वर्चस्वासाठी दर चार वर्षांनी होणारा ‘रन’संग्राम म्हणजेच विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १० देश सज्ज झाले आहेत. यानिमित्ताने या संघांची आतापर्यंतची कामगिरी, क्रमवारीतील स्थान, अपेक्षित कामगिरी, बलस्थाने आणि कच्चे दुवे यांचा लेखाजोखा आजपासून ‘रन’संग्राममध्ये मांडण्यात येणार आहे.

चेंडू फेरफार प्रकरणातून नाचक्की झालेले ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट त्यातून सावरत पुन्हा आत्मविश्वासाने उभे राहत आहे. या कटाचे सूत्रधार डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांचे विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन झाले आहे. वॉर्नरचे सध्याचे सातत्य आणि सांघिक समतोल या बळावर ऑस्ट्रेलियाला विश्वविजेतेपद टिकवणे जड जाणार नाही.

सर्वाधिक पाच वेळा विश्वविजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या तीन विश्वचषक स्पर्धामध्ये जेतेपद पटकावता आले नाही. १९८७मध्ये अ‍ॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रथमच जगज्जेतेपद काबीज केले. त्यानंतर ते वर्चस्व आजमितीपर्यंत टिकून आहे. १९९९मध्ये स्टीव्ह वॉ, तर २००३ आणि २००७मध्ये रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सलग तीन विश्वचषक जिंकले आहेत.

मग २०१५मध्ये मायकेल क्लार्क मायदेशात विश्वविजेते जिंकून दिले. त्यानंतर स्मिथकडे भावी विश्वविजेता कर्णधार म्हणूनच पाहिले जात होते. परंतु चेंडू फेरफार प्रकरणामुळे तो कलंकित झाल्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा आरोन फिंचकडे आहे.

अपेक्षित कामगिरी

विश्वचषकातील आकडेवारी, सध्याची कामगिरी आणि वॉर्नर-स्मिथचे पुनरागमन या बळावर ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीपर्यंत मजल मारू शकतो. या वाटचालीत त्यांना भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांच्याकडून प्रतिकार होऊ शकतो. परंतु विजेतेपद टिकवणे त्यांच्यासाठी फारसे जड जाणार नाही.

बलस्थाने आणि कच्चे दुवे

आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक सहाव्यांदा विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. वॉर्नर आणि स्मिथ यांचे पुनरागमन हे विश्वचषकाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियासाठी फलदायी ठरू शकेल. ‘आयपीएल’मध्ये वॉर्नरने १२ सामन्यांत ६९.२०च्या सरासरीने सर्वाधिक ६९२ धावा काढताना विश्वचषकाच्या दृष्टीने जणू इशाराच दिला आहे. फलंदाज पीटर हँड्सकोम्ब आणि वेगवान गोलंदाज जोश हॅझलवूड ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. इंग्लिश भूमीवर खेळण्याचा दांडगा अनुभव ऑस्ट्रेलियाच्या गाठीशी आहे. विश्वचषकाआधीच्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध दोन आणि पाकिस्तानविरुद्ध एक मालिका खेळला आणि यापैकी दोन मालिका जिंकल्या. भारताविरुद्ध मायदेशात १-२ अशी मालिका गमावली, तर प्रतिस्पध्र्याच्या भूमीवर ३-२ अशी जिंकली. मग पाकिस्तानविरुद्ध ५-० असे निर्भेळ यश मिळवले आहे.

इ ति हा स

१९७५ : नवख्या एकदिवसीय क्रिकेट प्रकारात ऑस्ट्रेलियाचा संघ अनुभवी मानला जात होता. इयान चॅपेलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ब-गटात पाकिस्तान व श्रीलंकेला नामोहरम केले, परंतु विंडीजकडून ते पराभूत झाले. मग उपांत्य फेरीत इंग्लंडला नमवून अंतिम फेरी गाठणाऱ्या ऑस्ट्रेलियाची पुन्हा विंडीजशी गाठ पडली. विंडीजच्या ८ बाद २९१ धावसंख्येपुढे ऑस्ट्रेलियाने १७ धावांनी पराभव पत्करला. त्यांचे पाच फलंदाज या सामन्यात धावचीत झाले.

१९७९ : ऑस्ट्रेलियाने किम ुजेसच्या नेतृत्वाखाली पूर्णत: नवा संघ यावेळी विश्वविजेतेपदासाठी पाठवला. साखळीत अ-गटात इंग्लंड आणि पाकिस्तानकडून पराभव पत्करल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

१९८३ : ब-गटात सहा सामन्यांपैकी फक्त दोन विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. भारत आणि नवख्या झिम्बाब्वेकडूनही ऑस्ट्रेलियाने हार पत्करली.

१९८७ : अ‍ॅलन बोर्डरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने प्रथमच विश्वचषक जिंकून इतिहास घडवला. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने एक धावेने जगज्जेत्या भारताला हरवले. अ-गटात ऑस्ट्रेलियाचा एकमेव पराभव भारताकडूनच झाला. मग उपांत्य सामन्यात डेव्हिड बूनचे अर्धशतक आणि क्रेग मॅकडरमॉटचे पाच बळी या बळावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पाडाव केला. त्यानंतर अंतिम सामन्यात पुन्हा बूनने ७५ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने २५३ धावांचे आव्हान उभे केले. मग बिली अ‍ॅथलेच्या अर्धशतकामुळे इंग्लंडने लक्ष्याकडे वाटचाल केली. पण अखेरच्या षटकात १७ धावा त्यांना करता आल्या नाही आणि ऑस्ट्रेलियाने सात धावांनी सामना जिंकून जेतेपदावर नाव कोरले.

१९९२ : विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. कारण राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत त्यांना आठपैकी चारच सामने जिंकता आले. दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय पुनरागमन झोकात साजरे करताना पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. मग इंग्लंड-पाकिस्तान सामना निकाली न ठरल्यामुळे मिळालेला एक गुण पाकिस्तानच्या पथ्यावर पडला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला बाद फेरी गाठता आली नाही.

१९९६ : अ-गटात ऑस्ट्रेलियाने पाचपकी तीन सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत जाण्यास नकार दिल्यामुळे या सामन्यात श्रीलंकेला विजयी घोषित केले. उपांत्यपूर्व सामन्यात मार्क वॉच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत केले. मग उपांत्य सामन्यात शेन वॉर्नच्या फिरकीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने विंडीजला हरवले. अंतिम सामन्यात मार्क टेलरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाने ७ बाद २४१ धावा केल्या, तर श्रीलंकेने हे आव्हान ४६.२ षटकांतच पार केले. अरविंद डिसिल्व्हाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे श्रीलंकेने जेतेपद तर ऑस्ट्रेलियाने उपविजेतेपद पटकावले.

१९९९ : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. साखळीत ब-गटात त्यांना पाचपैकी तीन सामने जिंकता आले. मग ‘सुपर सिक्स’ टप्प्यात भारत, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेला नमवून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना ‘टाय’ झाला. परंतु ‘सुपर सिक्स’मधील अप्रतिम कामगिरीच्या बळावर त्यांना पुढे चाल देण्यात आली. अंतिम सामन्यात शेर्न वॉर्नच्या फिरकीपुढे पाकिस्तानचा डाव फक्त १३२ धावांत आटोपला. मग अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने आठ गडी राखून विजय मिळवला.

२००३ : ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतील सर्व ११ सामने जिंकत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. परंतु स्पर्धेआधी उत्तेजकांचे सेवन केल्याप्रकरणी शेन वॉर्नला मायदेशी पाठवण्यात आले. साखळीत अ-गटात ऑस्ट्रेलियाने सहापैकी सहा सामने जिंकले. मग ‘सुपर सिक्स’मध्ये श्रीलंका, न्यूझीलंड आणि केनियाला हरवत बाद फेरी गाठली. उपांत्य सामन्यात ‘डकवर्थ-लुइस’ नियमानुसार श्रीलंकेला नमवून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात रिकी पाँटिंगच्या (१४०*) शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २ बाद ३५९ धावांचा डोंगर उभारला. त्यापुढे भारताचा डाव २३४ धावांत गडगडला.

२००७ : रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने कॅरेबियन बेटावर विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रिक साकारली. साखळीत अ-गटात ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने जिंकले. मग ‘सुपर एट’ टप्प्यात वेस्ट इंडिज, बांगलादेश, इंग्लंड, आर्यलड, श्रीलंका आणि न्यूझीलंडला हरवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात ग्लेन मॅकग्रा आणि शॉन टेट यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव १४९ धावांत गुंडाळला. मग हे आव्हान मायकेल क्लार्कच्या अर्धशतकामुळे तीन फलंदाजांच्या मोबदल्यात त्यांनी आरामात पार केले. अंतिम सामन्यात अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या १४९ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने ४ बाद २८१ धावांचे आव्हान उभे केले. परंतु श्रीलंकेच्या ३६ षटकांत ८ बाद २१५ धावा झाल्या असताना पाऊस आला आणि ‘डकवर्थ-लुइस’ नियमानुसार ऑस्ट्रेलियाने ५३ धावांनी सामना जिंकत विजेतेपद पटकावले. ग्लेन मॅकग्रा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

२०११ : अ-गटातून ऑस्ट्रेलियाने सहापैकी चार सामने जिंकत सहज उपांत्यपूर्व फेरी गाठली. कर्णधार पाँटिंगच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने ६ बाद २६० धावा केल्या.  मग भारताने पाच गडी राखून हे आव्हान पेलल्यामुळे ऑस्ट्रेलियाला गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या पाँटिंगने सामन्यानंतर ड्रेसिंगरूमचा टीव्ही संच फोडला.

२०१५ : मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वविजेतेपदावर हक्क प्रस्थापित केला. अ-गटात ऑस्ट्रेलियाने सहापैकी चार सामने जिंकले. मग जोश हॅझलवूडचा भेदक मारा आणि स्टीव्ह स्मिथ, शेन वॉटसनंच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला उपांत्यपूर्व सामन्यात हरवले. उपांत्य सामन्यात स्मिथच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने भारतावर ९५ धावांनी शानदार विजय संपादन केला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने १८३ धावांचे तुटपुंजे आव्हान उभारले. त्यानंतर स्मिथ आणि क्लार्कच्या अधशतकांमुळे ३३.१ षटकांतच ऑस्ट्रेलियाने सात गडी राखून विजय साजरा केला. मिचेल स्टार्क स्पर्धेत सर्वोत्तम ठरला.

ऑस्ट्रेलिया

क्रमवारीतील स्थान : ५

सहभाग : १९७५ ते २०१९ (सर्व)

कामगिरी : सामने ८४, विजय ६२, पराभव २०, टाय १, रद्द १, टक्केवारी ७५.३० %

विजेतेपद : १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५

उपविजेतेपद : १९७५, १९९६

संघ : आरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरेंड्रॉफ, अ‍ॅलेक्स केरी (उपकर्णधार व यष्टीरक्षक), नॅथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स उस्मान ख्वाजा, नॅथन लायन,

शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

* प्रशिक्षक : जस्टिन लँगर.

साखळीतील सामने

१ जून – वि. अफगाणिस्तान

६ जून – वि. वेस्ट इंडिज

९ जून – वि. भारत

१२ जून – वि. पाकिस्तान

१५ जून – वि. श्रीलंका

२० जून – वि. बांगलादेश

२५ जून – वि. इंग्लंड

२९ जून – वि. न्यूझीलंड

६ जुलै – वि. दक्षिण आफ्रिका