मेलबर्न : अरिना सबालेन्काने ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील वर्चस्व कायम राखताना सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली. यासह एवोनी गुलागोन्ग आणि मार्टिना हिंगिस यांच्या विक्रमाशी तिने बरोबरी साधली. उपांत्य फेरीत एलिना स्विटोलिनाचा सरळ सेटमध्ये पराभव करणाऱ्या सबालेन्काची आता जेतेपदासाठी एलिना रायबाकिनाशी शनिवारी गाठ पडेल.
सबालेन्का आणि रायबाकिना यापूर्वी २०२३ मध्ये एकमेकींविरुद्ध याच स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळल्या होत्या. त्यावेळी सबालेन्काने बाजी मारली होती. त्यानंतर २०२४ मध्ये जेतेपद राखण्यात सबालेन्काला यश आले होते. गेल्या वर्षी अंतिम फेरीत ती अमेरिकेच्या मॅडिसन कीजकडून पराभूत झाली. त्यामुळे यंदा ती जेतेपद परत मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवूनच स्पर्धेत खेळत आहे.
स्विटोलिनावर मात
उपांत्य फेरीच्या लढतीत अग्रमानांकित सबालेन्काने लौकिकाला साजेसा खेळ करताना १२व्या मानांकित युक्रेनच्या स्विटोलिनावर ६-२, ६-३ अशी सहज मात केली. या लढतीत सबालेन्काने प्रतिस्पर्धीची सर्व्हिस चार वेळी तोडली, तर स्विटोलिनाला एकदाच अशी कामगिरी करता आली. तसेच खेळात अचूकता राखल्याचाही सबालेन्काला फायदा झाला. स्विटोलिनाने अव्वल १० पैकी दोन खेळाडूंना पराभूत करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, गुरुवारी सबालेन्काच्या ताकदवान खेळापुढे ती पूर्णपणे निष्प्रभ ठरली. सबालेन्काविरुद्ध स्विटोलिनाचा हा सलग सहावा पराभव ठरला.
पेगुलाचा पराभव
दुसरीकडे, पाचव्या मानांकित कझाकस्तानच्या रायबाकिनाने सहाव्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा ६-३, ७-६ (९-७) असा पराभव करत स्पर्धेतील घोडदौड कायम राखली. रायबाकिना आता २०२३च्या स्पर्धेतील अंतिम लढतीमधील पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न करेल. यंदा उपांत्य फेरीत पहिला सेट सहज जिंकल्यानंतर रायबाकिनाला दुसऱ्या सेटमध्ये पेगुलाकडून प्रतिकार सहन करावा लागला. मात्र, ‘टायब्रेकर’मध्ये सरस खेळ करत तिने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
दोन्ही खेळाडू लयीत
सबालेन्का आणि रायबाकिना या दोघींनीही यंदाच्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. दोन्ही खेळाडू पूर्णपणे लयीत असून त्यांनी अद्याप एकही सेट गमावलेला नाही. सबालेन्का पाचव्या, तर रायबाकिना दुसऱ्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रयत्नशील आहे. सबालेन्काने सलग ११ सामने जिंकले असून रायबाकिनाने गेल्या २० पैकी केवळ एका सामन्यात हार पत्करली आहे. त्यामुळे अंतिम लढत चुरशीची होणे अपेक्षित आहे.
सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणे हे माझ्यासाठी नक्कीच मोठे यश आहे. मात्र, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. मला अंतिम फेरीतही सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. उपांत्य फेरीतील विजयाने मी खूश आहे. स्विटोलिना गुणवान खेळाडू आहे आणि तिला हरवणे सोपे नव्हते. – अरिना सबालेन्का
अंतिम फेरी गाठल्याचे समाधान आहे. जेसिका पेगुलाने अप्रतिम झुंज दिली. दुसरा सेट ‘टायब्रेकर’मध्ये गेल्यानंतर थोडे दडपण जाणवू लागले होते. मला याआधी या स्पर्धेत ‘टायब्रेकर’मध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यावेळी मी सकारात्मक निकाल मिळवल्याचा आनंद आहे. – एलिना रायबाकिना
पुरुष एकेरी उपांत्य लढत आज
कार्लोस अल्कराझ वि. ॲलेक्झांडर झ्वेरेव
सकाळी ९ वा.
नोव्हाक जोकोविच वि. यानिक सिन्नेर
दुपारी २ वा.
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस टेन २, ३

