भारतीय टेबल टेनिसपटूंसाठी आजचा दिवस विजयदिन ठरला. भारताचे अव्वल टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमल आणि अँथोनी अमलराज यांनी विजयासह तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
कमल-अमलराज जोडीने नेपाळच्या पुरुषोत्तम बजराचार्य आणि अमर लाल माल्ला यांच्यावर ६-११, ११-५, ११-८, १२-१० असा विजय मिळवला. कमल-अमलराज जोडीला पहिला गेम गमवावा लागला असला तरी त्यानंतर त्यांनी सलग दोन गेम जिंकले. चौथा आणि निर्णायक गेम अटीतटीचा झाला असला तरी या दोघांनी अनुभव पणाला लावत गेमसह सामनाही जिंकला.पहिल्या फेरीत पुढची चाल मिळालेल्या सौम्यजित घोष आणि हरमित देसाई यांनी फक्त १५ मिनिटांमध्ये येमेनच्या ओमार अहमद अली आणि मोहम्मद गुरबान यांना १२-१०, ११-५, ११-६ असे पराभूत केले. मिश्र दुहेरीमध्ये अमलराज आणि मधुरिका पाटकर यांनी जपानच्या सेइया किशिकावा आणि अली फुकुहारा यांच्यावर ५-११, १३-११, ११-८, ११-४ असा २६ मिनिटांमध्ये विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

सेपकटकराँ : निराशाजनक कामगिरी
सेपकटकराँ भारताच्या पदरी मंगळवारी निराशाच पडली. भारतीय संघाला प्राथमिक रेगू स्तरावर पराभवाचा सामना करावा लागला.पुरुषांना यजमान दक्षिण कोरियाकडून १३-२१, ६-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर मलेशियानेही भारताचा २२-२४, १८-२१ असे पराभूत केले. आतापर्यंत दोन विजयांसह भारताचा गटामध्ये तिसरा क्रमांक आहे. निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय महिला संघ गटामध्ये तळाला पोहोचला आहे.

कबड्डी : महिला संघ उपांत्य फेरीत
आशियाई सुवर्णपदक कायम राखण्याच्या दृष्टीने भारतीय महिला कबड्डी संघाने एक ठोस पाऊल मंगळवारी टाकले. यजमान दक्षिण कोरियावर भारताने ४५-२६ असा दमदार विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.पहिल्या सत्रात आक्रमक खेळ करत भारताने २९-१८ अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. भारताने या सामन्यात कोरियावर तीन लोण चढवले, यामधील दोन लोण पहिल्या सत्रामध्ये होते, तर दोन बोनस गुणही पटकावले. भारताकडून पहिल्या सत्रामध्ये ममता पुजारीने जोरदार आक्रमण करत चांगल्या चढाया केल्या. तिला कर्णधार तेजस्विनी बाई आणि पूजा ठाकूर यांच्याकडून चांगली साथ मिळाली. भारताचा उपांत्य फेरीचा सामना २ ऑक्टोबरला होणार आहे. सलामीच्या लढतीत भारताने बांगलादेशला २९-१८ असे पराभूत केले होते.

हॅण्डबॉल : महिला आठव्या स्थानी
भारतीय महिलांना अटीतटीच्या लढतीमध्ये थायलंडकडून ३०-३१ असा एका गुणाने पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पहिल्या सत्रामध्ये भारताने १४-१२ अशी आघाडी घेतली होती, पण दुसऱ्या सत्रामध्ये थायलंडने जोरदार आक्रमण करत भारताशी बरोबरी केली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये थायलंडने ५-४ अशी बाजी मारत सामना जिंकला आणि सातवे स्थान पटकावले. पुरुषांच्या हॅण्डबॉल संघावर १४व्या स्थानावर पोहोचण्याची नामुष्की ओढवली, त्यांना रविवारी संयुक्त अरब अमिरातीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

तायक्वांडो : लतिका भंडारी उपांत्यपूर्व फेरीत
भारताच्या लतिका भंडारीने विजयी सलामी देत भारतीय तायक्वांडो मोहिमेची चांगली सुरुवात केली. ललिताने ५३ किलो वजनी गटामध्ये ताझाकित्सानच्या फरझोना राडझाबोव्हावर ७-२ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

कुस्ती : ग्रीको-रोमनमध्ये निराशाजनक सुरुवात
फ्री-स्टाईलप्रमाणेच ग्रीको-रोमन कुस्तीत भारतीय मल्ल चांगली सुरुवात करतील अशी अपेक्षा होती मात्र भारतीय मल्लांनी निराशाजनक प्रारंभ केला. कृष्णकांत यादवने कांस्यपदक मिळविण्याच्या संधीवर पाणी सोडले. ७१ किलो गटात त्याला इराणच्या सईद अब्दवालीने ३-० असे पराभूत केले. या लढतीत प्रारंभापासूनच वर्चस्व ठेवीत इराणच्या मल्लाने यादवला फारशी संधी दिली नाही. यादवला उपान्त्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले, मात्र त्यानंतर रिपेच फेरीद्वारे त्याला कांस्यपदकाची लढत खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा लाभ घेण्यात तो अपयशी ठरला. भारताच्या रवींदरसिंग व हरप्रीतसिंग यांना उपान्त्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला. ५९ किलो गटात रवींदरला कझाकिस्तानच्या अल्मात केबीस्पायेव्हने ३-० असे हरविले. ८० किलो गटात हरप्रीतला उजबेकिस्तानच्या साल्हेदेझ बेसिकीने ३-१ असे पराभूत केले.

नौकानयन : कांस्यपदकाची कमाई
महिलांच्या दुहेरी नौकानयन (सेलिंग) स्पर्धेमध्ये भारताच्या वर्षां गौतम आणि ऐश्वर्या नेडुचेझियान यांनी कांस्यपदकाची कमाई केली. कर्णधार वर्षां आणि तिही सहकारी ऐश्वर्या यांनी २५ गुण पटकावले. नेत्रा कुमानन आणि रामया सावरानान यांना आपल्या एकेरी स्पर्धेमध्ये सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.पुरुषांच्या ऑप्टिमिस्ट विभागाच्या एकेरी प्रकारामध्ये चित्रेश ताथाला ६३ गुणांसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.