Asha Bhosle Passes Away: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची वयाच्या ९२व्या वर्षी प्राणज्योत मालवली. अनेक दशकं आपल्या समधूर आवाजाने सर्वांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताईंच्या निधनाचे बातमीने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली आहे. आशाताईंची यांची अनेक हिंदी-मराठी गाणी चाहत्यांच्या काळजाला हात घालणारी आहेत. पण तुम्हाला माहित आहे का आशाताईंनी आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाचा यशस्वी गोलंदाज ब्रेट ली याच्याबरोबर देखील गाणं गायलं आहे, वाचूया या गाण्यामागची कहाणी.

आशाताईंच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतून त्यांना श्रध्दांजली वाहिली जात आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली याच्यासोबत केलेलं गाणंदेखील आता व्हायरल होत आहे. आशाताई व ब्रेट ली यांचं २००७ मधील “You’re the One for Me” हे गाणं पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आशा भोसले आणि स्पीडस्टार गोलंदाज ब्रेट ली यांचं गाणं तुम्हाला आठवतंय का?

“हाँ, मैं तुम्हारा हूँ” या हिंदी ओळीमुळे खास ओळखलं जाणारं हे गाणं क्रिकेट आणि संगीताचा दुर्मिळ संगम ठरला. या गाण्यात ब्रेट ली केवळ गिटार वाजवताना दिसत नाहीये, तर इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये गाताना दिसत आहे. आशा भोसले यांनी त्यांच्या खास शैलीत ब्रेटला मार्गदर्शन करत गाण्याला चार चाँद लावले होते. विशेष बाब म्हणजे हे गाणं हिंदीमध्ये होतं आणि ते ब्रेट ली याने लिहिलं होतं.

आशा भोसले आणि ब्रेट ली यांनी गायलेलं हे गाणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २००६ दरम्यान प्रदर्शित झालं. आशा ताईंसोबक गाणं गाणारा ब्रेट ली, निःसंशयपणे क्रिकेटच्या मैदानातील दिग्गज खेळाडू आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने १,०३४ बळी घेतले आहेत. ब्रेटने हे बळी प्रथम-श्रेणी क्रिकेट, लिस्ट ए क्रिकेट आणि टी-२० क्रिकेट या तिन्ही प्रकारांमध्ये मिळून घेतले. त्याने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये ४८७, लिस्ट ए क्रिकेटमध्ये ४३८ आणि टी-२० क्रिकेटमध्ये १०९ बळी घेतले.

आशा भोसले यांचे सचिन तेंडुलकरसोबतही जवळचे नाते होते. आशा ताई सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा सर्वश्रेष्ठ तारा म्हणत असत. आशा भोसले १९९२ आणि २०२३ च्या विश्वचषक स्पर्धांमध्येही सचिन तेंडुलकरसोबत उपस्थित होत्या.