Sachin Tendulkar Name Connection with Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसले यांनी वयाच्या ९२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अनेक दशक आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांवर अधिराज्या गाजवणाऱ्या आशाताई आपल्या नसल्या तरी त्यांच्या अजरामर गाण्यांनी त्या आपल्यात कायम असतील. क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि गानसम्राज्ञी आशा भोसले या दोन दिग्गजांच्या क्षेत्रात मोठा फरक असला, तरी त्यांच्यात एक असं खास कनेक्शन आहे जे फार कमी लोकांना माहिती आहे. सचिन तेंडुलकरला आशाताई आपला मुलगा मानत. सचिनच्या नावाशीदेखील आशाताईंचं खास कनेक्शन आहे.
सचिन तेंडुलकर आणि महान गायिका आशा भोसले यांचं नातं खूप खास आणि घट्ट होतं. आशाताई सचिनवर अगदी आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करत असत. २०२३ मध्ये या दोन महान दिग्गजांच्या भेटीचे फोटो सोशल व्हायरल झाले होते. सचिनने ते फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करून आशाताईंबद्दल आदर व्यक्त केला होता. सचिन तेंडुलकर व आशाताईंच्या या मायलेकाच्या नात्याचे अनेक क्षण आपण पाहिले आहेत.
सचिन तेंडुलकरचे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं?
सचिन तेंडुलकर याचं नाव खरंतर संगीत जगतातून प्रेरित होऊन त्याच्या वडिलांनी ठेवलं होतं. सचिनचे वडील, रमेश तेंडुलकर यांना संगीताची प्रचंड आवड होती. ते महान संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन (एस.डी. बर्मन) यांचे मोठे चाहते होते. याच आवडीमुळे त्यांनी आपल्या मुलाचं नाव त्या महान संगीतकाराच्या नावावरून सचिन ठेवलं. सचिन देव बर्मन यांचा मुलगा आर.डी. बर्मन, यांनी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्याशी विवाह केला होता.
आशा भोसले यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, त्या सचिनला आपल्या मुलाप्रमाणे मानतात. जेव्हा जेव्हा त्या सचिनला भेटतात, तेव्हा त्यांना कुटुंबातील आपल्या माणसाला भेटल्यासारखं वाटतं. त्याच्या साधेपणाने, नम्रतेने आणि संस्कारांनी त्या खूप प्रभावित झाल्या होत्या. आशा भोसले यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सचिन त्यांच्यासाठी मुलासारखा आहे. त्या सचिनला केवळ एक महान खेळाडूच नव्हे, तर एक आदर्श व्यक्तीही मानतात.
सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरच्या लग्नसोहळ्याला आशाताईंनी हजेरी लावली होती. वयाच्या ९२व्या वर्षीही आशाताई खास अर्जुनला आशीर्वाद देण्यासाठी तेंडुलकर घराण्याच्या या खास सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. आशाताई याच लग्नसोहळ्याला अखेरच्या दिसल्या होत्या.
