ब्रिस्बेनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील अ‍ॅडलेड कसोटीही आपल्या नावावर केली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा २७५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह त्यांनी ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-०अशी आघाडी घेतली आहे. यजमानांनी याआधी ब्रिस्बेन कसोटीत पाहुण्या इंग्लंडवर ९ गडी राखून विजय मिळवला होता. अ‍ॅडलेडमध्ये हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला गेला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने डे-नाईट कसोटीत १०० टक्के विजयाचा विक्रमही कायम ठेवला आहे. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

अ‍ॅडलेड कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ४६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण, इंग्लंडचा संघ त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यापासून खूप दूर दिसत होता. इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनने ४२ धावांत ५ बळी घेतले. मिचेल स्टार्क आणि नॅथन लायनने २-२ विकेट घेतल्या. मायकेल नेसरला एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. ख्रिस वोक्सने ४४ धावा केल्या. यष्टीरक्षक जोस बटलरने २०७ चेंडू खेळून काढत २६ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs SA : कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच चाहत्यांना धक्का; वाचा नक्की घडलंय काय?

संक्षिप्त धावफलक –

नाणेफेक – ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) – ९ बाद ४७३ धावा (डाव घोषित)

इंग्लंड (पहिला डाव) – सर्वबाद २३६

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) – ९ बाद २३० (डाव घोषित)

इंग्लंड (दुसरा डाव) – सर्वबाद १९२