ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅडलेड ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जोस बटलरने शानदार झेल घेतला, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम झुगारत बटलरने ‘स्पायडरमॅन’ झेल घेत मार्कस हॅरिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टुअर्ट ब्रॉडने मार्कस हॅरिसला एक आखुड टप्प्याचा चेंडू टाकला, हॅरिसने डावीकडील हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा चेंडू यष्टीपाठी गेला. यष्टीमागे उभ्या असलेल्या बटलरने त्याच्या उजव्या बाजूला सूर मारत पूर्ण अप्रतिम झेल घेतला.

जोस बटलरच्या सनसनाटी झेलने समालोचकही हैराण झाले. मार्कस हॅरिस अवघ्या ३ धावांचे योगदान देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ट्विटर हँडलवर जोस बटलरच्या खळबळजनक झेलचा व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे. शिवाय, आयपीएलमधील बटलरचा संघ राजस्थान रॉयल्सनेही या झेलचे कौतुक करत बटलरला ‘स्पायडरमॅन’ म्हटले आहे.

बटलरच्या चमकदार झेलमुळे क्रिकेट जगतात त्याची प्रशंसा होत आहे. अनेकांनी याला वर्षातील सर्वोत्तम झेल म्हटले. भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनेही बटलरच्या या झेलचे कौतुक केले आहे. पॅट कमिन्स बाहेर पडल्यामुळे स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी चांगला खेळ केला. स्मिथने या दिवस-रात्र कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

हेही वाचा – Explained: विराट, रोहित, बीसीसीआय नी कर्णधारपद; काय आहे नेमका वाद?

डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (१६७ चेंडूंत ९५ धावा) आणि भरवशाचा मार्नस लाबुशेन (२७५ चेंडूंत ९५) यांनी साकारलेल्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले. या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने २ बाद २२१ धावांपर्यंत मजल मारली असून लाबुशेनच्या साथीने कर्णधार स्टीव्ह स्मिथ १८ धावांवर खेळत आहे. सलामीवीर मार्कस हॅरिस (३) पुन्हा अपयशी ठरल्यानंतर वॉर्नर, लाबुशेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी १७२ धावांची भागीदारी रचली. लाबुशेनला दोनदा जीवदान लाभले. लाबुशेन-स्मिथ यांनी तिसऱ्या गड्यासाठी ४५ धावांची भर घातली असून लाबुशेनला आज शुक्रवारी कारकीर्दीतील सहावे शतक झळकावण्याची संधी आहे.