Australia vs England 1st Test, Playing XI: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये होणारी आणि मानाची समजली जाणारी अ‍ॅशेस मालिका २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका जिंकणं वर्ल्डकप जिंकण्यापेक्षा कमी नसतं. यावेळी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानाव खेळवला जाणार आहे. पर्थ कसोटी सुरू होण्याच्या एक दिवसाआधीच ऑस्ट्रेलियाने आपली प्लेईंग ११ जाहीर केली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी स्टीव्ह स्मिथची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून २ खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली जाणार आहे. ब्रेंडन डोगेट आणि जेक वेदराल्ड हे दोन्ही खेळाडू आपला पहिलाच कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात १४ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडणार आहे. याआधी २०१०-११ मध्ये एकाच सामन्यात २ खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. त्यावेळी उस्मान ख्वाजा आणि मायकल बीर यांनी एकत्र पदार्पण केलं होतं. आता १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा असा दुर्मिळ योगायोग पाहायला मिळणार आहे.

या सामन्यात आपला पहिलाच सामना खेळत असलेला वेदराल्ड उस्मान ख्वाजासोबत मिळून डावाची सुरूवात करताना दिसू शकतो. गेल्या हंगामात शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत धावांचा पाऊस पाडत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तर डॉगेटने देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार गोलंदाजी केली आहे. आता हे दोन्ही खेळाडू मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतील का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.////

या सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेईंग ११:

उस्मान ख्वाजा, जेक वेदराल्ड, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिशेल स्टार्क, नाथन लायन, ब्रँडन डॉगेट, स्कॉट बोलँड