Australia vs England 4th Test: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ॲशेस कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. मात्र पहिल्याच दिवशी दोन्ही संघातील गोलंदाज चमकले. तर फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १५२ धावांवर आटोपला. तर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा डाव अवघ्या ११० धावांवर संपुष्टात आला. यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात पुन्हा एकदा आघाडी घेतली. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने क्षेत्ररक्षण करताना २ झेल घेतले. यासह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

स्टीव्ह स्मिथच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंदऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा स्लिपमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. चौथ्या कसोटी सामन्यात त्याने क्षेत्ररक्षण करताना त्याने जॅक क्रॉली आणि बेन स्टोक्स यांचे झेल घेतले. यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या विक्रमात त्याने भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविडला मागे टाकलं आहे.

राहुल द्रविडच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये २१० झेल टिपण्याची नोंद आहे. तर स्टीव्ह स्मिथने आता २१२ झेल घेतले आहेत. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या जो रूटच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये २१४ झेल टिपण्याची नोंद आहे.क्षेत्ररक्षणासह स्टीव्ह स्मिथने फलंदाजीतही अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पॅट कमिन्स बाहेर झाल्यामुळे स्मिथकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०१० मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याला ऑस्ट्रेलियाकडून १२२ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत नेमकं काय घडलं?

बॉक्सिंग डे कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव १५२ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या ११० धावांवर आटोपला.