Will Jacks Catch: ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने ३३४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना जेक वेदराल्ड, मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. दरम्यान स्टीव्ह स्मिथला बाद करण्यासाठी विल जॅक्सने डाईव्ह मारून भन्नाट झेल घेतला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जो रूटच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या डावात ३३४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आलेल्या ट्रॅव्हिस हेड आणि जेक वेदराल्ड या जोडीने दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून ७७ धावा जोडल्या. ट्रॅव्हिस हेड ३३ धावा करत माघारी परतला. तर वेदराल्डने ७२ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्नस लबुशेनने ६५ धावांची दमदार खेळी केली. तर कॅमरून ग्रीनने ४५ आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही ६१ धावांचे योगदान दिले.
विल जॅक्सचा भन्नाट कॅच
तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना स्टीव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी ही जोडी मैदानावर होती. त्यावेळी इंग्लंडकडून ५७ वे षटक टाकण्यासाठी ब्रायडन कार्स गोलंदाजीला आला. या षटकातील चौथा चेंडू कार्सने शॉर्ट चेंडू टाकला. या चेंडूवर स्मिथने पुल शॉट मारला. पण हा फटका फसला. दरम्यान बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या विल जॅक्सने डाईव्ह मारली आणि एका हाताने भन्नाट झेल घेतला. त्यामुळे स्टीव्ह स्मिथचा डाव ६१ धावांवर आटोपला.
इंग्लंडने केल्या ३३४ धावा
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले. बेन डकेट आणि ओली पोप शून्यावर माघारी परतले. त्यानंतर झॅक क्रॉली आणि जो रूट यांनी मिळून संघाचा डाव सांभाळला. झॅक क्रॉलीने ७६ धावांची खेळी केली. तर जो रूटने नाबाद १३८ धावांची खेळी केली. हॅरी ब्रूकने ३१, बेने स्टोक्सने १९ धावा केल्या. शेवटी फलंदाजी करताना विल जॅक्सने १९ आणि जोफ्रा आर्चरने ३८ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ३३४ धावांवर पोहोचवली.
