Marnus Labuschagne Catch: अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. बॉक्सिंग डे कसोटीतील दुसऱ्याच दिवशी मोठा वाद पेटल्याचे पाहायला मिळाले आहे. पहिल्या दिवशी २० विकेट्स पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका पाठोपाठ विकेट्स पडणं सुरू राहिलं. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लबुशेन पहिल्या स्लीपमध्ये जो रूटच्या हातून झेलबाद झाला. रूटने झेल घेताच इंग्लंडचे खेळाडू जल्लोष करू लागले, पण लबुशेनने मैदान न सोडता तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. झेल घेण्यापूर्वी चेंडू आणि जमिनीचा संपर्क झाला असल्याचा संशय असल्याने तो तिथेच थांबून राहिला.
मार्नस लबुशेनशह नॉन स्ट्राईकला असलेल्या ट्रॅव्हिस हेडलाही असाच काहीसा संशय होता. त्यामुळे हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवण्यात आला. अंपायरने बरेच अँगल पाहिले. चेंडू आणि जमिनीचा संपर्क झाला असल्याचं दिसू येत होतं. पण अंपायरने हा निर्णय इंग्लंडच्या बाजूने दिला. तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत असलेल्या अहसान रजाने लबूशेनला बाद घोषित केलं. लबूशेनला बाद घोषित करताच इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं.
लबूशेन आऊट होता का?
मार्नस लबूशेन आऊट होता की नॉट आऊट? यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पण ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर फलंदाज जस्टिन लँगर यांच्या मते, अंपायर्सने योग्य निर्णय घेतला आहे. चॅनल सेवेन वर बोलताना जस्टिन लँगर म्हणाले, “तो आऊट आहे, तुम्ही पाहू शकता झेल घेत असताना त्याचे बोटं चेंडूच्या खाली आहेत.” पण मार्नस लबुशेनला हेच वाटत होतं की, झेल घेण्यापूर्वी चेंडू आणि जमिनीचा संपर्क झाला आहे. त्यामुळे तो नाराज होता. तर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
पहिल्या दिवशी काय घडलं?
बॉक्सिंग डे कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव १५२ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा डाव ११० धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव १३२ धावांवर आटोपला.. यासह ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी अवघ्या १७५ धावांचे आव्हान ठेवले.
