अत्यंत रंगतदार झालेल्या अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने आपल्या शेवटच्या विकेटचा बचाव करत ऑस्ट्रेलियाचे विजयी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. सिडनीत पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाने ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा इंग्लंडच्या झॅक क्रॉवली आणि हसीब हमीद या सलामीवीरांनी बिनबाद २९ अशी मजल मारली. पण पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंड, पॅट कमिन्स यांनी चांगला मारा करत इंग्लंडची वाईट अवस्था केली. शेवटच्या दोन षटकात इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड झुंज देत होते. या दोघांनी ही दोन्ही षटके खेळून काढत सामना ड्रॉ केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी दोन्ही डावात शानदार फलंदाजी करत इंग्लंड संघाला सिडनीमध्ये सन्मान राखण्यास मदत केली. दुसऱ्या डावात स्टोक्सने ६० आणि बेअरस्टोने ४१ धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी पाचव्या दिवशी ३८८ धावांची गरज होती, पण संघ ९ विकेट गमावून केवळ २७० धावा करू शकला. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रावलीने सर्वाधिक ७७ धावा केल्या. सिडनी कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ ३-० ने आघाडीवर आहे.

हेही वाचा – VIDEO : शेवटच्या कसोटीत रॉस टेलर झाला भावूक, राष्ट्रगीत सुरू असताना आवरता आले नाही अश्रू!

दुखापत असूनही स्टोक्सने दमदार खेळी करत १० चौकार आणि एक षटकार लगावला. इंग्लंडलाही नशिबाची साथ लाभली. पाचव्या दिवशी पावसामुळे खेळात व्यत्यय आला. ऑस्ट्रेलियाच्या ३८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने एकही विकेट न गमावता ३० धावा केल्या, परंतु सकाळच्या सत्रात सलामीवीर हसीब हमीद (९) आणि डेव्हिड मलान (४) यांनी निराशा केली. पॅट कमिन्सच्या चेंडूवर कॅरीने हमीदला जीवदान दिले, पण त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही. ऑफस्पिनर नाथन लायनने आपल्या तिसऱ्या षटकात मलानला बोल्ड करून इंग्लंडची धावसंख्या २ बाद ७४ अशी केली. सलामीवीर क्रावलीने १३ चौकारांसह ७७ धावा केल्या.

हा रंगतदार सामना पाहून महाविकास आघाडी सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही एक ट्वीट केले. ”म्हणूनच आपण कसोटी क्रिकेट साजरे केले पाहिजे. आज अ‍ॅशेसच्या शेवटची १० षटकांत क्षेत्ररक्षण, कौशल्य आणि खेळाच्या दोन्ही बाजूंची तीव्रता दिसली”, असे ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले.

संक्षिप्त धावफलक

  • नाणेफेक – ऑस्ट्रेलिया (फलंदाजी)
  • ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) – ८ बाद ४१६ (डाव घोषित)
  • इंग्लंड (पहिला डाव) – सर्वबाद २९४
  • ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) – ६ बाद २६५ (डाव घोषित)
  • इंग्लंड (दुसरा डाव) – ९ बाद २७० (सामना ड्रॉ)
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashes series australia vs england fourth test result aditya thackeray reacts adn
First published on: 09-01-2022 at 14:18 IST