वृत्तसंस्था, मेलबर्न

प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्याला आज, शुक्रवारपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिले तीन सामने जिंकून मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे ॲशेस करंडक ऑस्ट्रेलियाकडेच राहणार हेदेखील स्पष्ट झाले आहे. आता ऑस्ट्रेलियाचा संघ वर्चस्व राखण्याचे ध्येय बाळगूनच मैदानात उतरेल. त्याच वेळी मालिका गमावलेल्या इंग्लंडचा किमान पत राखण्याचा प्रयत्न असेल.

इंग्लंड संघाची २०११ सालापासून ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकण्याची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. यंदाच्या ॲशेस मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांतही इंग्लंडच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस आणि तिसऱ्या कसोटी सामन्याचा अखेरचा दिवस वगळता, इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाला झुंजही देऊ शकलेला नाही.

ऑस्ट्रेलियाला यंदाच्या मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचा सामना करावा लागला आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पाचही सामन्यांसाठी उपलब्ध नाही. नियमित कर्णधार पॅट कमिन्स केवळ एक कसोटी सामना खेळू शकला, तर बदली कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही मालिकेतील तिसऱ्या सामन्याला मुकावे लागले होते. ऑफ-स्पिनर नेथन लायननेही केवळ दोन सामन्यांत सहभाग नोंदवला आहे. मात्र, यानंतरही अन्य खेळाडूंनी वेळोवेळी खेळ उंचावत ऑस्ट्रेलियाला विजयी केले आहे.

‘एमसीजी’ येथे आजपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीलाही कमिन्स मुकणार आहे. मात्र, स्मिथचे पुनरागमन होणार असून तोच नेतृत्वाची जबाबदारी सांभाळेल. दुसरीकडे, पहिल्या तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर आव्हान उपस्थित करणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर अखेरच्या दोन सामन्यांना मुकणार आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज ऑली पोपलाही वगळण्यात आले आहे. डावखुरा फलंदाज जेकब बेथल आणि वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन यांना संधी मिळणार असून हे दोघे मोठा प्रभाव पाडतील अशीच ऑस्ट्रेलियाला आशा असेल.

स्मिथचे पुनरागमन; वेगवान गोलंदाजांना पसंती

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या (एमसीजी) खेळपट्टीवर अतिरिक्त गवत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या सामन्यात चार विशेषज्ञ वेगवान गोलंदाज खेळविण्यास पसंती दिली आहे. गेल्या सामन्यात खेळलेले नेथन लायन (जायबंदी), कर्णधार पॅट कमिन्स (विश्रांती) आणि जोश इंग्लिस (वगळले) हे तिघे या सामन्यासाठी संघाबाहेर असतील. इंग्लिसच्या जागी स्टीव्ह स्मिथचे पुनरागमन होईल आणि तो संघाचे नेतृत्व करेल. तसेच झाय रिचर्डसन, ब्रेंडन डॉगेट आणि मायकल नीसर या तिघांपैकी दोन वेगवान गोलंदाजांना अंतिम ११ मध्ये संधी मिळणार आहे, असे स्मिथने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

संघ

ऑस्ट्रेलिया (संभाव्य ११) : ट्रॅव्हिस हेड, जेक वेदराल्ड, मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), कॅमरून ग्रीन, मायकल नीसर, मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, स्कॉट बोलँड.

इंग्लंड (अंतिम ११) : झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), विल जॅक्स, गस ॲटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोश टंग.

वेळ : सकाळी ५ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, जिओहॉटस्टार ॲप.