यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या पारंपरिक प्रतिस्पध्र्यांमधील प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत असून पॅट कमिन्स आणि जो रूट या कर्णधारांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.

कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा पहिला वेगवान गोलंदाज असून त्याचे विजयी प्रारंभ करण्याचे लक्ष्य असेल. दुसरीकडे रूटने कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियातील मागील अ‍ॅशेस मालिका ०-४ अशी गमावल्याने त्याच्यावर दडपण आहे. 

इंग्लंडचा संघ धावांसाठी रूटवर अवलंबून असून त्याला जोस बटलर, अष्टपैलू बेन स्टोक्सची साथ लाभेल. गोलंदाजीत अनुभवी जेम्स अँडरसनला पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली असून ख्रिस वोक्स, ऑली रॉबिन्सन, मार्क वूड आणि स्टुअर्ट ब्रॉड या चौकडीला संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजीत डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांच्यावर मदार असून संघात अनुभवी गोलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळे दोन तुल्यबळ संघांतील पहिल्या कसोटीत कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

संघ

’ ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमरन ग्रीन, अ‍ॅलेक्स केरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नेथन लायन, जोश हेझलवूड.

’ इंग्लंड (अंतिम १२) : जो रूट (कर्णधार), रोरी बन्र्स, हसीब हमीद, डेविड मलान, बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ऑली रॉबिन्सन, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच.

’ सामन्याची वेळ : पहाटे ५.३० पासून

’ थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स