इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचने बुधवार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेसाठी तयारी करत आहे आणि त्यासाठी भारताचा फिरकीपटू अष्टपैलू रवींद्र जडेजाचे व्हिडिओ पाहत असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या दमदार कामगिरीदरम्यान जडेजाच्या गोलंदाजीने लीच प्रभावित झाला होता. लीचने इंग्लंडकडून १६ कसोटी सामन्यांत ६१ बळी घेतले आहेत. पण लीच ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

“मला वाटत नाही की तो (जडेजा) भारतात जे करतो त्यापेक्षा थोडे वेगळे काही केले. पाहून छान वाटले. तो जे करतो ते त्याने केले आणि यश मिळवले,” असे लीचने म्हटले आहे. लीचने असेही सांगितले की ऑस्ट्रेलियाचा नॅथन लियॉनही प्रभावी ठरला आहे आणि येथील परिस्थितीमध्ये हा ऑफस्पिनर कसा गोलंदाजी करतो याकडे त्याचे लक्ष आहे.

“मी अनेक वर्षांपासून नॅथन लियॉनला पाहत आहे आणि तो खूप प्रभावशाली आहे. त्याचा स्टॉक बॉल खूप चांगला आहे आणि ज्या विकेट्सवर त्याला जास्त फिरकी येत नाही, तिथे त्याला अतिरिक्त बाऊन्स मिळतो आणि इतर गोष्टी करण्याचा मार्ग मिळते, असे लीचने म्हटले आहे. “मी माझ्या गोलंदाजीमध्ये या प्रकारच्या गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहे पण माझ्या मुद्द्यांवर टिकून आहे, असेही लीच म्हणाला. स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने अ‍ॅशेससाठी तंदुरुस्त असल्याचे म्हटले आहे आणि यामुळे संघाला चांगली कामगिरी करण्यास मदत होईल असे लीचने म्हटले आहे.

दरम्यान, अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेल्या या संघात यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीचाही समावेश करण्यात आला आहे. टीम पेन गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियासाठी कसोटी यष्टिरक्षक म्हणून काम करत आहे, पण एका प्रकरणानंतर त्याने प्रथम कर्णधारपद सोडले आणि नंतर क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आहे, तर स्टीव्ह स्मिथ उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.