Ashish Nehra masterstroke for Vaibhav Sooryavanshi Wicket: वैभव सूर्यवंशीने IPL 2026 मध्ये आपला तडाखेबाज फॉर्म कायम ठेवत गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या १३ चेंडूत ३६ धावांची वादळी खेळी केली. मात्र २३० धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना तो बाद झाला. मोहम्मद सिराजने हुशार गोलंदाजी करत त्याला जाळ्यात अडकवलं. पण सूर्यवंशीच्या विकेटमागे खरा मास्टरस्ट्रोक कोच आशिष नेहराचा होता, ज्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
संपूर्ण हंगामात सूर्यवंशीने राजस्थानला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. गुजरातविरूद्ध सामन्यातही त्याने दणक्यात सुरूवात करत गोलंदाजांची शाळा घेतली. मात्र सिराजने संयम राखत महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवला. सिराजने टाकलेल्या शॉर्ट चेंडूवर सूर्यवंशी गोंधळला आणि टॉप-एज लागत चेंडू शॉर्ट फाइन लेगकडे झेलबाद झाला. वैभव सूर्यवंशीच्या विकेटनंतर राजस्थानचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. अखेरीस राजस्थान रॉयल्सला फक्त १५२ धावांपर्यंत मजल मारता आली आणि संघाला ७७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
वैभव सूर्यवंशीने बाद होण्यापूर्वी मोहम्मद सिराजची चांगलीच धुलाई केली होती. सिराजच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता. सूर्यवंशीने त्याच्या एका षटकात एक षटकार आणि तीन चौकार लगावले होते, त्यामुळे सिराज दबावाखाली दिसत होता. मात्र त्याच वेळी आशिष नेहराने डगआऊटमधून सूत्र हलवली.
व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये नेहराने सिराजला सूर्यवंशीच्या शरीरावर, विशेषतः डोक्याजवळ चेंडू टाकण्याचा इशारा केला. सिराजने ती रणनिती अचूक रितीने अमलात आणत गुजरातसाठी धोकादायक ठरत असलेल्या वैभव सूर्यवंशीची महत्त्वाची विकेट मिळवली. आशिष नेहराच्या या मास्ट्ररस्ट्रोकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Gujarat Titans ने IPL 2026 मध्ये सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी केली आहे. राजस्थानविरुद्धच्या विजयामुळे गुजरात गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून, ११ सामन्यांत त्यांचे सात विजय झाले आहेत. उर्वरित सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळाले तरी त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित होऊ शकते.
दुसरीकडे, Rajasthan Royalsने हंगामात दणक्यात सुरूवात केली. संघाने मागील चारपैकी तीन सामने गमावले असून, प्लेऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी त्यांना आता विजयाची नितांत गरज आहे. राजस्थान सध्या सहा विजय आणि चार पराभवांसह चौथ्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या चार जागांसाठी सहा संघांमध्ये चुरशीची लढत सुरू असल्याने प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
