Ashish Nehra speaks on Team India Head Coach post: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकापदाबाबत कायमच चर्चा पाहायला मिळते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने स्पर्धेची जेतेपदं पटकावली असली तरी मालिकांमधील संघाच्या कामगिरीबाबत निराशा आहे. दरम्यान गंभीर यांचा कार्यकाळ २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर संपणार आहे. गंभीरनंतर व्ही व्ही एस लक्ष्मण हे नाव प्रशिक्षकपदासाठी समोर येत असलं तरी त्यांच्याकडे सेंटर ऑफ एक्सलन्सची जबाबदारी आहे. यादरम्यान आयपीएलमध्ये प्रशिक्षणाची उत्तम जबाबदारी सांभाळणाऱ्या आशिष नेहराचं नावदेखील चर्चेत आहे. पण याबाबत बोलताना नेहराने काय म्हटलंय, जाणून घेऊया.

गंभीर यांच्यानंतर या पदासाठी संभाव्य उत्तराधिकारी म्हणून दिग्गज खेळाडू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांचे नावही वारंवार चर्चेत आलं आहे. लक्ष्मण सध्या बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे प्रमुख आहेत आणि अधूनमधून भारतीय संघाला प्रशिक्षणही देतात. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्येही व्ही व्ही एस लक्ष्मण भारतीय संघाचे कोच असणार आहेत.

व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याव्यतिरिक्त, माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचं नावही टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी दावेदार म्हणून चर्चेत आलं आहे; मात्र, यापूर्वी त्याने या विषयावर कधीही भाष्य केलं नव्हतं. आता मात्र त्याने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल’च्या पुरस्कार सोहळ्यात बोलताना आशिष नेहराने सांगितलं की, टीम इंडियाचा प्रशिक्षक बनणं ही त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल, मात्र सध्या त्याची तशी कोणतीही इच्छा नाही. नेहरा हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये ‘गुजरात टायटन्स’चा मुख्य प्रशिक्षक आहे; त्याच्या मार्गदर्शनाखाली या संघाने तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे आणि एकदा विजेतेपदही पटकावलं आहे.

आशिष नेहरा टीम इंडियाचा कोच होण्याबाबत नेमकं काय म्हणाला?

“सर्वप्रथम, मी ‘महत्त्वाकांक्षा’ हा शब्द वापरणार नाही. मी कधीच भविष्यातील गोष्टींचं आधीच नियोजन करत नाही. हो, टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनणं ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट असेल. पण मी अशा गोष्टींचं नियोजन करत नाही. भविष्यात काय होतं ते पाहू. माझी अशी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. मी सध्या जिथे आहे, तिथे खूप आनंदी आहे,” असं आशिष नेहराने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (CAB) वार्षिक पुरस्कार सोहळ्यात बोलताना सांगितलं.

तो पुढे म्हणाला, “GTबाबत अनेकजण म्हणतात की, ‘तुम्ही कोचिंगमध्ये चांगलं काम केलं आहे.’ पण हे केवळ माझं यश नाही; हे संपूर्ण संघाचं यश आहे. हो, जेव्हा तुमचा कर्णधार किंवा प्रशिक्षक चर्चेत असतो, तेव्हा त्यांना श्रेय दिलं जातं. विशेषतः भारतात असं नेहमीच होतं. पण मी याला ठामपणे विरोध करतो.”

भारताचा मुख्य प्रशिक्षक होण्याची संधी मिळाल्यास अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल, असं नेहराने स्पष्ट केलं. “आत्ता याचं उत्तर देणं खूप कठीण आहे. सर्वप्रथम मला माझ्या ‘हाय कमिशन’ची परवानगी घ्यावी लागेल आणि ती म्हणजे माझी पत्नी. नाहीतर ती मला घटस्फोट देईल,” असं नेहरा मिश्कीलपणे म्हणाला. तो पुढे म्हणाला, “या भूमिकेसाठी खूप प्रवास करावा लागतो. जवळपास आठ ते नऊ महिने प्रवासातच जातात. हे सोपं नाही.”

गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिष नेहराने २०२२मध्ये पहिल्याच हंगामात फ्रँचायझीला आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं. यानंतर GTने २०२३ आणि २०२६मध्ये उपविजेतेपद मिळवलं.