मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या(एमसीए) अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींना सुप्रीम कोर्टाने ठाम पाठिंबा दिल्यानंतर शरद पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाचा स्वत:हून राजीनामा दिला होता. त्यानंतर माजी कसोटीवीर दिलीप वेंगसरकर यांनीही एमसीएच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एमसीएच्या कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत आशिष शेलार यांची एकमताने निवड करण्यात आली. याशिवाय, एमसीएने लोढा समितीच्या शिफारशी देखील मान्य केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात एमसीएमधील आणखी काही अधिकाऱयांवर गदा येण्याची शक्यता आहे.

वाचा: ..तर एमसीएतील सहाच जणांची पदे टिकतील!

लोढा समितीच्या शिफारशींनुसार नऊ वर्षांहून अधिक काळ कोणत्याही व्यक्तीला संघटनेवरील पद सांभाळता येणार नाही. या नियमानुसार एमसीएच्या निवडणुकीद्वारे सध्या कार्यरत असलेल्या १५ सदस्यांपैकी प्रवीण अमरे, गणेश अय्यर, शाह आलम, नवीन शेट्टी, आशीष शेलार आणि उन्मेश खानविलकर या सहा जणांनाच आपली पदे टिकवता येऊ शकतात. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत. पुढील महिन्यात मुंबई महानगरपालिका निवडणुका देखील आहेत. त्यामुळे निवडणुका सांभाळून सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करत एमसीएच्या आगामी निडणुका घेणे अशी आव्हानं आशिष शेलार यांच्यासमोर असणार आहे.

[jwplayer 91by7vYx]

 

क्रीडा संघटनेचा पदाधिकारी किंवा सभासद ६० वर्षांहून अधिक वयाचा नसावा अशी सुधारणा लोढा समितीने सुचविली होती. त्यास सुप्रीम कोर्टाने पूर्णत: पाठिंबा दिला होता. त्यामुळे वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या शरद पवार यांनी एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दोनवेळा एमसीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. याशिवाय शरद पवार २०१० ते २०१२ या कालावधीत आयसीसीचे चेअरमन म्हणूनही कामगिरी बजावली होती. आता एमसीएच्या निवडणुका होईपर्यंत कारभार सांभाळण्याची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे असणार आहे.

[jwplayer LskqTooi]