Ashish Yadav Javelin World U20 Silver: आशिष यादवने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेकमध्ये भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अमेरिकेतील ओरेगॉन येथे झालेल्या २०२६ वर्ल्ड अंडर-२० अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने पुरुष भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. विशेष म्हणजे, नीरज चोप्राने २०१६ मध्ये या स्पर्धेत भारतासाठी भालाफेकमध्ये पहिलं पदक जिंकल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी हा पराक्रम करणारा आशिष दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.
१९ वर्षीय आशिषने ७४.०९ मीटरची सर्वोत्तम फेक करत दुसरं स्थान मिळवलं. दक्षिण आफ्रिकेच्या यान-हेन्रिक हेयमन्सने ८०.५० मीटर फेकीसह सुवर्णपदक पटकावलं, तर डॉमिनिकाच्या अॅडिसन जेम्सने ७३.८९ मीटर फेक करत कांस्यपदक जिंकले. या रौप्यपदकामुळे आशिष यादव वर्ल्ड U20 चॅम्पियनशिपच्या भालाफेक प्रकारातील पदक मंचावर उभा राहणारा नीरज चोप्रानंतर केवळ दुसरा भारतीय ठरला आहे.
आशिषसाठी हे पदक पटकावणं सोपं नव्हतं. अंतिम फेरीत त्याने पहिल्या प्रयत्नात ६९.९६ मीटर फेक केली, तर दुसरा प्रयत्न फाऊल ठरला. त्यामुळे सुरुवातीलाच त्याच्यावर दबाव निर्माण झाला होता. मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्याने शानदार पुनरागमन करत भाला ७४.०९ मीटरपर्यंत फेकला आणि थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. यानंतर त्याने ७२.३१ मीटर, ७०.६२ मीटर आणि ६७.९८ मीटर अशा फेका केल्या. मात्र त्याच्या मागील कोणत्याही खेळाडूला त्याच्यापेक्षा उत्तम थ्रो करता आला नाही.
आशिषची ही कामगिरी त्याच्या वैयक्तिक आणि हंगामातील सर्वोत्तम ७४.४९ मीटर फेकीपेक्षा थोडी कमी होती. तरीही, कनिष्ठ कारकिर्दीतील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने भारतासाठी महत्त्वाचं रौप्यपदक जिंकत भविष्यातील मोठ्या यशाची आशा अधिक बळकट केली आहे.
आशिष यादवची पात्रता फेरीतील कामगिरीनेच त्याच्या मोठ्या यशाची चाहूल दिली होती. त्याने अ गटात ६९.८७ मीटरची फेक करत अव्वल स्थान पटकावलं होतं आणि एकूण क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या यान-हेन्रिक हेयमन्सनंतर दुसऱ्या स्थानावर राहिला होता. हेयमन्सने ब गटात ७६.०२ मीटर फेक करत बाजी मारली होती. अंतिम फेरीतही हेयमन्सने सुरुवातीपासूनच स्वतःला स्पष्ट दावेदार म्हणून सिद्ध केलं. त्याने पहिल्याच प्रयत्नात ७६.९२ मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ७६.४० मीटरची फेक करत इतर खेळाडूंवर मोठी आघाडी मिळवली. तिसऱ्या फेरीत त्याचा प्रयत्न फाऊल गेला, तरीही त्याचं वर्चस्व कायम राहिलं. अखेरीस शेवटच्या प्रयत्नात त्याने निर्णायक ८०.५० मीटरची फेक करत सुवर्णपदक निश्चित केलं, तर आशिष यादवला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
