Ashleigh Gardner statement on separation from Monika Wright allegations: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची उपकर्णधार अॅश्ले गार्डनर गेल्या अनेक काळापासून चर्चेत आहे. गार्डरनने फसवणूक केल्याचा आरोप तिची पत्नी मोनिका राईट हिने केला होता. गार्डनरने ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू जॉर्जिया वॉल हिच्यासोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. मोनिका राईटने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हे आरोप केले होते. यावर आता गार्डरने पोस्ट शेअर करत वक्तव्य केलं आहे.
अॅश्ले गार्डनरने गुरुवारी तिच्या पत्नीपासून विभक्त होण्याबाबत अखेर मौन सोडलं. तिने मोनिका राईटबरोबरचं तिचं नाव संपल्याची कबुली देत, झालेल्या त्रासासाठी माफी मागितली आणि या प्रकरणात प्रायव्हसी राखण्याची विनंती केली. गार्डनरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही प्रतिक्रिया दिली. तिच्या लग्नातील दुराव्यानंतर निर्माण झालेल्या वादावर हे तिचं पहिलंच वक्तव्य ठरलं असून, ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये हा विषय मोठ्या चर्चेचा बनला आहे.
गार्डनरचं वक्तव्य अशा वेळी आलं, जेव्हा मोनिका राइट हिने सार्वजनिकरित्या गार्डनरवर ऑस्ट्रेलियाचीच क्रिकेटपटू जॉर्जिया वॉल हिच्यासोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. दोघांच्या विभक्त होण्याच्या बातम्या समोर आल्यानंतर राइटने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये वॉलची ओळखही उघड केली होती. या आरोपांवर गार्डनरने यापूर्वी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, तर जॉर्जिया वॉलनेही या प्रकरणावर अद्याप भाष्य केलेलं नाही.
गार्डनरने तिच्या पोस्टमध्ये जॉर्जिया वॉलशी संबंधित आरोपांवर थेट भाष्य केलं नाही. त्याऐवजी २९ वर्षीय क्रिकेटपटूने या विभक्त होण्याचा झालेला परिणाम मान्य करत, त्यामुळे झालेल्या वेदनांबद्दल खेद व्यक्त केला. गार्डनर म्हणाली, “माझं आणि माझ्या पत्नीचं विभक्त होणं हा वैयक्तिक विषय असला, तरी ऑस्ट्रेलियन महिला संघाची उपकर्णधार म्हणून माझ्या सध्याच्या नातेसंबंधाच्या स्थितीबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भूमिका स्पष्ट करणं आवश्यक होतं,” असं अॅश्ले गार्डनरने म्हटलं.
तिने पुढे सांगितलं की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बोर्डाने माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पाठिंबा दिला, याबद्दल मी कृतज्ञ आहे. आगामी हंगामात संघातील लीडर म्हणून मजबूत भूमिका बजावण्याची आणि सहकाऱ्यांना शक्य तितका सर्वोत्तम पाठिंबा मी देण्याचा प्रयत्न करेन. गार्डनरने मोनिका राइटसोबत घालवलेल्या काळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हटलं, “मोनिका आणि मी एकत्र घालवलेल्या वेळेबद्दल मी आभारी आहे. या सर्वामुळे झालेल्या वेदनांसाठी मी खंत व्यक्त करते. भविष्यासाठी मी तिला आनंद आणि यशाच्या शुभेच्छा देते.”

गार्डनरने पुढे स्पष्ट केलं की, या प्रकरणावर यापुढे मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही आणि या विषयात सहभागी असलेल्या सर्वांच्या गोपनीयतेचा आदर केला जावा, अशी माझी विनंती आहे.
