Ashleigh Gardner Monica Wright Controversy Cricket Australia: ऑस्ट्रेलियाची उपकर्णधार अ‍ॅश्ले गार्डनर हिची विभक्त पत्नी मोनिका राइट हिने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर (CA) तीव्र टीका केली आहे. यादरम्यान तिने अ‍ॅश्ले गार्डनर हिला पदावरून काढून टाकण्याची मागणीदेखील केली आहे. मोनिका राईटने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सुनावत कथित प्रेमसंबंध प्रकरणात संस्थेने कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. गार्डनरचे सहकारी खेळाडू जॉर्जिया वॉलसोबत कथित संबंध असल्याचा आरोप राइटने यापूर्वी जुलै महिन्यात इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत केला होता.

अ‍ॅश्ले गार्डनरची विभक्त पत्नी चीटिंग प्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियावर संतापली

राइटने २९ वर्षीय गार्डनरकडून राष्ट्रीय संघातील नेतृत्वाची जबाबदारीही काढून घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कोड स्पोर्ट्सशी बोलताना राइट म्हणाली, “जेव्हा तुम्हाला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते आणि तुमच्याकडे एक रोल मॉडेल (आदर्श व्यक्तिमत्त्व) म्हणून पाहिलं जातं, तेव्हा स्वतः उच्च नैतिक मापदंड जपण्याची जबाबदारी असते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत सार्वजनिकरीत्या कोणतीच भूमिका का घेतली नाही, हे मला समजत नाही. त्यांच्या मौनाचा अर्थ ते अ‍ॅश्ले आणि जॉर्जियाच्या वर्तनाचं समर्थन करत आहेत असा घ्यायचा का?”

राइटने आणखी गंभीर आरोप करत म्हटलं, “संघातील कनिष्ठ सदस्यासोबत प्रेमसंबंध ठेवून नेतृत्वाच्या भूमिकेत राहणं योग्य नाही. कर्णधाराकडून आदर्श निर्माण करण्याची अपेक्षा असते आणि अशा प्रकारचं वर्तन त्या निकषांवर बसत नाही.”

मोनिका राइटच्या कोड स्पोर्ट्सवरील वक्तव्याला उत्तर देताना क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA)ने हे प्रकरण “खासगी आणि वैयक्तिक” असल्याचं म्हटलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात म्हटलं, ‘परस्परविरोधी हितसंबंधातून नेतृत्व करणाऱ्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करतो, जेणेकरून संघातील एकोपा टिकून राहावा.’

जुलै महिन्यात राइटने डेली मेलमधील एका वृत्ताचा स्क्रीनशॉट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत म्हटलं होतं की “नेमकं काय घडलं ते मी सांगणार आहे”. पुढील इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने जॉर्जिया वॉलचा फोटो पोस्ट करत, “माझ्या पत्नीने जिच्यासोबत मला फसवलं ती ही आहे” असं लिहिलं होतं.

डेली मेलच्या वृत्तानुसार, राइट आणि गार्डनर यांनी एप्रिल २०२५ मध्ये विवाह केला होता. मात्र २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी गार्डनर भारतात असताना त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ लागला. राइट भारतात गार्डनरला भेटण्यासाठी आली होती, तेव्हा वातावरणात काहीसा ताण आणि अवघडलेपणा जाणवत होता, असा दावा एका सूत्राने केल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.