पाकिस्तान संघ आणि अगम्य अनाकलनीय घडामोडी हे समानार्थी शब्द आहेत. याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. आपात्कालीन परिस्थितीत सहाय्यक प्रशिक्षकपद सोपवण्यात आलेल्या प्रशिक्षकाने पाकिस्तानाची साथ सोडली आहे.
पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. या दौऱ्यातील दोन कसोटी गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सगळ्यांना धक्का देत संघातील सात खेळाडूंना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये वनडे आणि टी२० कर्णधार सलमान अघा, तसंच माजी कर्णधार मोहम्मद रिझवान यांचाही समावेश होता.
या दोघांच्या बरोबरीने मुख्य प्रशिक्षक सर्फराझ अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही घरी पाठवण्यात आलं. वनडे आणि टी२० प्रशिक्षक माईक हेसन यांच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली. त्यांच्या बरोबरीने अॅशले नॉफक यांच्याकडे सहाय्यक प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली.
एवढं सगळं होऊनही पाकिस्तानच्या कामगिरीत बदल झाला नाही. तिसऱ्या कसोटीतही पाकिस्तानचा पराभव झाला आणि इंग्लंडने निर्भेळ यश साजरं केलं. नॉफक यांनी आता नेदरलँड्स संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर नॉफक पाकिस्तानच्या जबाबदारीतून मुक्त होणार आहेत. त्यांचा आर्थिक करार जून २०२७ पर्यंत होता मात्र त्यांनी आताच पद सोडायचं ठरवलं आहे. काही दिवसांपूर्वीच शेन मॅकडरमॉट यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपद सोडलं आहे.
मे २०२५ मध्ये नॉफक यांनी पाकिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारलं होतं. आता ते नेदरलँड्सचे मावळते प्रशिक्षक रायन कुक यांची जागा घेतील. नॉफक यांच्या मार्गदर्शनात ब्रिस्बेन हिट, लंडन स्पिरीट आणि क्वीन्सलॅंड फायर यांनी स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं.
