Ashok Sharma Bowled Fastest Ball Of IPL 2026: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शनिवारच्या डबल हेडरमधील दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २१० धावांचा मोठा डोंगर उभारल. यादरम्यान गोलंदाजी करताना गुजरात टायटन्सच्या गोलंदाजाने स्पर्धेतील सर्वात जलद चेंडू टाकला आहे. सर्वात जलद चेंडू टाकणारा हा गोलंदाज अशोक शर्मा आहे तरी कोण, जाणून घेऊया.

आयपीएल २०२६ मध्ये, गुजरात टायटन्सचा तरूण वेगवान गोलंदाज अशोक शर्माने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आपल्या प्रभावी कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रफ्तार सिंग या नावाने ओळखला जाणारा अशोक, ताशी १४० ते १५० किलोमीटर वेगाने सातत्याने गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. या सामन्यात अशोकने आपला वेग दाखवला आणि या हंगामातील सर्वात वेगवान चेंडूदेखील टाकला.

राजस्थान रॉयल्सच्या डावातील १६ व्या षटकात अशोक शर्माने या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. या षटकातील शेवटच्या चेंडूचा वेग ताशी १५४.२ किलोमीटर होता. १५४ किमी वेगाचा हा चेंडू यॉर्कर होता, जो मिडिल आणि ऑफ स्टंपवर पडून ध्रुव जुरेलच्या बॅटची कड घेत पॅडवर आदळला, पण अशोकच्या या चेंडूने संपूर्ण स्टेडियमला थक्क केलं. राजस्थान रॉयल्सने २१० धावा केल्या असतानाही अशोक शर्माने प्रति षटक १० पेक्षा कमी धावा दिल्या, ही त्याची गोलंदाजी किती प्रभावी होती हे दाखवून देणारी बाब आहे.

अशोक शर्माने संपूर्ण सामन्यात आक्रमक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ४ षटकांत ३७ धावा देऊन १ बळी घेतला, पण त्याच्या चेंडूंच्या वेगाने विरोधी फलंदाजांना अडचणीत आणलं. त्याचे यॉर्कर आणि हार्ड लेंथ चेंडू विशेषतः अखेरच्या षटकांमध्ये प्रभावी ठरले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील दमदार कामगिरीनंतर अशोक शर्माला गुजरात टायटन्सने आपल्या संघात घेतलं. २३ वर्षीय या गोलंदाजाने राजस्थानकडून खेळताना स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या, त्यामुळे त्याच्यासाठी आयपीएल करारासाठी चांगली चढाओढ झाली. मूळ ३० लाख किंमत असलेल्या अशोकसाठी केकेआर आणि राजस्थान यांच्याकडून बोली लावण्यात आल्या, अखेरीस राजस्थानने ९० लाखांना त्याला आपल्या ताफ्यात सामील केलं.

कोण आहे अशोक शर्मा? (Who is Ashok Sharma?)

अशोक शर्मा हा मूळचा जयपूरजवळील रामपुरा गावचा आहे. त्याचे वडील, नथूलाल शर्मा, शेतकरी आहेत. १७ जून २००२ रोजी जन्मलेला अशोक शर्मा शालेय जीवनापासूनच क्रिकेटच्या मैदानावर नियमितपणे खेळत आहे. यापूर्वी, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या वेगवान आणि स्विंग गोलंदाजीने लक्षणीय प्रभाव पाडला होता. देशांतर्गत टी-२० स्पर्धेतील त्याच्या कामगिरीमुळे त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

अशोक शर्मा व त्याचा भाऊ अक्षय शर्मा दोघेही क्रिकेट खेळत असत. जिल्हास्तरिय क्रिकेटमध्ये दोन्ही भावांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली. पण आर्थिक अडचणींमुळे फक्त एकालाच खेळणं परवडणारं होतं. त्याचा मोठा भाऊ अक्षयने आपल्या भावासाठी त्याग करत त्याला क्रिकेटमध्ये भविष्य घडवण्याची संधी दिली आणि आज अशोक आयपीएल खेळत आहे.

२०२२ मध्ये, या खेळाडूला केकेआरने ५५ लाख रुपयांना विकत घेतलं होतं, पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल २०२५ मध्ये, अशोक शर्मा ३० लाख रुपयांना राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला. पण पुन्हा एकदा, त्याला संधी मिळाली नाही. पण गुजरात टायटन्सने त्याला पहिल्याच सामन्यापासून संधी दिली आहे आणि त्याच्य कामगिरीची त्याने छाप पाडली आहे.