टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताला पाकिस्तानविरूद्ध १५ फेब्रुवारीला सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा फिरकीपटू सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेविरूद्ध सामन्यात पाकिस्तानने फिरकीपटू उस्मान तारिकला गोलंदाजीची संधी दिली होती. या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या. पण यादरम्यान त्याच्या गोलंदाजी अॅक्शनवर मोठी टीका केली जात आहे. पण आता रविचंद्रन अश्विनने त्याला सपोर्ट करत ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे.

अश्विनने उस्मान तारिकच्या अ‍ॅक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. अश्विनच्या मते, जर उस्मान तारिकच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित करायचे असतील तर क्रिकेटचे नियम बदलावे लागतील.

अश्विनने माजी भारतीय क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी पाकिस्तानी फिरकी गोलंदाज उस्मान तारिक याच्याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. गोस्वामी यांनी उस्मान तारिकच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित करत सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं, “फुटबॉलमध्येही पेनल्टी रन-अप घेण्यापूर्वी थांबण्याची परवानगी नाही. क्रिकेटमध्ये हे कसं स्वीकार्य मानलं जाऊ शकतं? कृती योग्य आहे, पण मध्येच थांबणं? आणि तेही चेंडू रिलीज करण्यापूर्वी थांबणं. क्रिकेटमध्ये हे असं नाही चालू शकत.”

श्रीवत्स गोस्वामी यांना पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिकच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनबद्दल आक्षेप नाही हे स्पष्ट आहे. त्यांची समस्या म्हणजे तो चेंडू रिलीज करण्यापूर्वी किती वेळ थांबतो. अश्विनने यावर स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

अश्विनने उस्मान तारिकची बाजू घेत पोस्टमध्ये लिहिलं, “फुटबॉलमध्ये थांबण्याची परवानगी नाही हे मान्य आहे. पण फलंदाजाला फक्त एकाच बाजूने फलंदाजी करायची आहे हे माहित असतानाही, पंच किंवा गोलंदाजाला न कळवता हिट स्विच करणं किंवा रिव्हर्स हिट करणं योग्य आहे का? बंदी नेहमीच गोलंदाजांपुरती मर्यादित का असावी? गोलंदाजांना पंचांना न कळवता हात बदलण्याची परवानगी का नाही? प्रथम, त्यांनी क्रिकेटचे हे नियम बदलले पाहिजेत.”

उस्मान तारिक त्याच्या अनोख्या गोलंदाजी शैलीमुळे फलंदाजांसाठी एक गूढच राहिला आहे. परिणामी, त्याने आतापर्यंत पाकिस्तानकडून खेळलेल्या चार टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ११ बळी घेतले आहेत. उस्मान तारिक भारताविरुद्ध कारकिर्दीतील पाचवा सामना खेळणार आहे. फिरकी गोलंदाजी करण्यात पारंगत असलेल्या भारतीय फलंदाजांविरुद्ध तो किती यशस्वी होतो, यावर सर्वांच्या नजरा असतील.