करोना विषाणूमुळे सर्वत्र हाहा:कार माजला आहे. करोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली IPL स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व क्रिकेटपटू आणि BCCI चे पदाधिकारी परिस्थिती सुरळीत होण्याची वाट पाहत आहेत. परदेशातील काही ठिकाणी फुटबॉलच्या स्पर्धा विनाप्रेक्षक सुरू करण्यात आल्या आहेत. भारतीय संघाची जुलै महिन्यात श्रीलंकेविरूद्ध क्रिकेट मालिका नियोजित आहे. मात्र क्रिकेटच्या स्पर्धा आणि प्रेक्षकांची उपस्थिती असं सारं काही नीट सुरू होण्यासाठी थोडा कालावधी जावा लागणार असं स्पष्ट दिसत आहे. अशा परिस्थितीत भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने एक धमाल व्हिडीओ शेअर केला आहे.

एका मैदानात काही मुलं क्रिकेट खेळतानाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडिओमध्ये गोलंदाज चेंडू टाकतो. चेंडू बॅटला न लागता किपरकडे जातो. किपर झेल पकडून फलंदाज बाद असल्याचं अपील करतो आणि अतिशय विनोदी दिसणारा छोटा मुलगा अंपायर म्हणून फलंदाजाला बाद ठरवतो. खरी मजा यापुढे सुरू होते. फलंदाज डीआरएस चा रिव्ह्यू हवा असल्याची खूण करतो. त्यानंतर चक्क एक खेळाडू चेंडू हातात धरून तो चेंडू कसा गेला याचा अ‍ॅक्शन रिप्ले करून दाखवतो आणि त्यात तो विनोदी दिसणारा मुलगा त्या फलंदाजाला नाबाद ठरवतो.

पाहा भन्नाट व्हिडीओ

दरम्यान, नुकताच अश्विनने भारताचा कर्णधार विराट कोहली याच्याशी ऑनलाइन संवाद साधला. त्यावेळी विराटने त्याला कर्णधार बनवण्यात धोनीचा किती मोठा वाटा होता ते सांगितले. “जेव्हा मी भारतीय संघात आलो, तेव्हापासून मला शिकण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. मैदानावर मी नेहमी धोनीच्या नजीक असायचो. मी माझ्या बर्‍याच कल्पना त्याला सांगायचो. त्यातल्या बऱ्याच तो नाकारायचाही.. पण एखादी कल्पना आवडल्यास तो माझ्याबरोबर काही गोष्टींवर चर्चा देखील करत असे. मैदानात असताना त्याचं नेहमी माझ्यावर बारीक लक्ष असायचं. मी त्याच्याकडून शिकत राहिलो आणि माझ्या जिज्ञासेमुळे कदाचित त्याला असा विश्वास वाटला की माझ्यानंतर हा संघाचे नेतृत्व करू शकतो”, असे विराटने सांगितले.