‘कसोटी मालिकेत पहिल्या दिवसापासूनच चेंडू वळू लागेल अशी आमची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत रविचंद्रन अश्विनचा सामना करणे आमच्यासाठी आव्हानात्मक असेल’, असे दक्षिण आफ्रिकेचा भरवशाचा फलंदाज फॅफ डू प्लेसिसने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘अश्विन दर्जेदार फिरकीपटू आहे. ट्वेन्टी-२० मालिकेत आम्ही त्याचा यशस्वीपणे सामना केला. कसोटी मालिकेत खेळपट्टय़ा त्याला अनुकूल आहेत. त्यामुळे त्याचा सामना करणे खडतर असेल’.
पूर्वीच्या तुलनेत भारतीय खेळपट्टय़ांचे स्वरूप आक्रमक झाले आहे. पूर्वी चौथ्या-पाचव्या दिवशी चेंडू मोठय़ा प्रमाणावर वळत असे. मात्र आता कसोटीच्या पहिल्या दिवशीच चेंडू वळतो. यामुळे तीनच दिवसांत कसोटीचा निर्णय लागतो. अशा परिस्थितीसाठी आम्ही योजना तयार केली आहे, असेही तो म्हणाला.