पीटीआय, मनिला (फिलिपाइन्स)
तारांकित बॅडिमटनपटू पीव्ही सिंधूने सिंगापूरच्या युई यान जेस्लिन हुईला सरळ गेममध्ये पराभूत करत गुरुवारी आशिया अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, सायना नेहवाल व जागतिक रौप्यपदक विजेत्या किदम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले. २०१४मध्ये आशिया अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या चौथ्या मानांकित सिंधूने जागतिक क्रमवारीत १००व्या स्थानावरील जेस्लिनला २१-१६, २१-१६ असे पराभूत केले. पुढील फेरीत तिचा सामना चीनच्या बिंग जिआओशी होणार आहे.
सात्त्विक-चिराग जोडीने जपानच्या अकिरा कोगा आणि ताईची साइतोला २१-१७, २१-१५ असे नमवले. सायनाचे चौथे पदक मिळवण्याचे स्वप्न पराभवामुळे धुळीस मिळाले. चीनच्या वँग झी यीकडून सायनाचा २१-१२, ७-२१, १३-२१ असा पराभव झाला. सायनाने दुखापतीतून सावरत स्पर्धेत भाग घेतला होता. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत चीनच्या वेंग होंग यांगने श्रीकांतला १६-२१, २१-१७, २१-१७ असे पराभूत केले.