पीटीआय, मनिला (फिलिपाइन्स)
दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूने चीनच्या ही बिंग जियाओवर रोमहर्षक विजय मिळवत आशिया बॅडिमटन अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची शुक्रवारी उपांत्य फेरी गाठली.
करोना साथीमुळे दोन वर्षांच्या अंतराने होणाऱ्या या आशिया खंडातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सिंधूने या विजयासह पदकाची निश्चिती केली आहे. २०१४मध्ये गिमशेऑन येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या चौथ्या मानांकित सिंधूने एक तास आणि १६ मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पाचव्या मानांकित जियाओला २१-९, १३-२१, २१-१९ असे नमवले.
यंदाच्या हंगामात सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय आणि स्विस खुली अशा ‘सुपर ३००’ श्रेणीच्या दोन स्पर्धा जिंकणाऱ्या हैदराबादच्या २६ वर्षीय सिंधूची उपांत्य फेरीत जपानच्या अग्रमानांकित अकाने यामागुचीशी गाठ पडणार आहे.
जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूची या सामन्याआधी जियाओविरुद्ध ७-९ अशी जय-पराजयाची कामगिरी होती. याआधीच्या दोन्ही सामन्यांत सिंधूने जियाओकडून पराभव पत्करला होता.
माजी विश्वविजेत्या सिंधूने पहिल्या गेममध्ये ११-२ अशी सहज आघाडी घेतली आणि नंतर गेमसुद्धा सहज खिशात घातला. दुसऱ्या गेममध्ये जियाओने दमदार पुनरागमन केले. जियाओने ६-४ आणि ११-१० अशी निसटती आघाडी घेतली. परंतु नंतर पाच सलग गुणांची कमाई करीत १९-१२ अशी भक्कम आघाडी मिळवली आणि मग दुसरा गेम जिंकला.
निर्णायक गेममध्ये सिंधूने ११-५ अशी आघाडी घेतली. पण जियाओने पुन्हा दिमाखदार टक्कर देत हे अंतर १५-१६ असे कमी केली. परंतु सिंधूने कमी फरकानेही १८-१६ अशी आघाडी आपल्याकडे राखली. अखेरीस तिसऱ्या गेमसह सामनासुद्धा जिंकला.
सात्त्विक-चिरागचे आव्हान संपुष्टात
भारताच्या सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. मलेशियाच्या आरोन शिआ आणि सोह वूइ यिक जोडीने त्यांचा १२-२१, २१-१४, २१-१६ असा पराभव केला.