पीटीआय, मनिला (फिलिपाइन्स) : जपानच्या अकाने यामागुचीकडून शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत तीन गेममध्ये पराभूत झाल्यामुळे दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूची आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील वाटचाल कांस्यपदकासह संपुष्टात आली. २६ वर्षीय सिंधूने सकारात्मक सुरुवात करीत विजयी घोडदौड कायम राखण्याची आशा दाखवली. परंतु अग्रमानांकित आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरील यामागुचीच्या खेळापुढे सिंधूचा निभाव लागला नाही. एक तास आणि सहा मिनिटांत यामागुचीने १३-२१, २१-१९, २१-१६ अशा फरकाने हा सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.

यंदाच्या बॅडमिंटन हंगामात सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय आणि स्विस खुली अशा दोन ‘सुपर ३००’ दर्जाच्या स्पर्धा जिंकणाऱ्या सिंधूने पहिला गेम फक्त १६ मिनिटांत जिंकला. दुसऱ्या गेममध्ये चौथ्या मानांकित सिंधूला सामनाधिकाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या सिंधूला एका गुणाचा दंड झाला. या वादाचा परिणाम सिंधूच्या खेळावर झाला आणि यामागुचीने दुसरा गेम जिंकत बरोबरी साधली. तिसऱ्या गेममध्ये सिंधू सुरुवातीपासून पिछाडीवर होती. अखेरीस यामागुचीने निर्णायक गेमसह सामना जिंकला. सिंधूच्या पराभवानिशी आशिया अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे आव्हान एका  कांस्यपदकासह संपुष्टात आले आहे. सिंधूने दुसऱ्यांदा आशिया स्पर्धेत कांस्यपदक कमावले. तिने २०१४मध्येही कांस्यपदक पटकावले होते.