आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला धक्का बसला आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पाकचे दोन फलंदाज माघारी पकरतले. यानंतर बाबर आझम आणि शोएब मलिक यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यानंतर १७ व्या षटकात गोलंदाजी करत असताना हार्दिक पांड्याचा पाय घसरल्यामुळे तो जखमी झालेला आहे. यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे.

हा प्रकार घडल्यानंतर भारताचे फिजीओ व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मैदानात धाव घेतली. मात्र स्ट्रेचरवरुन हार्दिक पांड्याला मैदानाबाहेर न्यावं लागल्यामुळे त्याला पाठीची दुखापत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार हार्दिकला पाठीची दुखापत होत असल्याचं कळतंय, सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून हार्दिक उपचारांना कसा प्रतिसाद देतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.