पाकिस्तानला धूळ चारल्यामुळे आत्मविश्वास बळावलेल्या भारतीय संघाला शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ‘सर्वोत्तम चार’ फेरीच्या पहिल्या लढतीत लढाऊ वृत्तीच्या बांगलादेशशी सामना करायचा आहे. आज होणाऱ्या सामन्यापूर्वीच मैदानाबाहेरील वातारण गरम झालेले दिसत आहे. बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तझाने बांगलादेश भारताविरोधात विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना मश्रफी मोर्तझा म्हणाला की, ‘कोणताही खेळ एखाद्या स्टार खेळाडूमुळे चालत नाही. मैदानावर तुमची कामगिरी तुमच्या संघाला विजय मिळवून देते. आम्ही योग्य नियोजन केले आहे. आम्ही आखलेल्या रणनीतीनुसार आम्ही भारतापेक्षा चांगली कामगिरी करू. जर आमची रणनीती यशस्वी झाली तर आमचा विजय निश्चित आहे.’

विराट कोहलीच्या अनुपस्थितीचा बांगलादेश संघाला फायदा मिळेल का? या प्रश्नावर मश्रफी मोर्तझाला भडकला. आणि म्हणाला, ‘फक्त विराट कोहलच्या अनुपस्थितीचीच चर्चा का केली जाते? आमचा स्टार खेळाडू तमीम इक्बालही नाही खेळत. जसा विराट कोहली नसल्याचा आम्हाला फायदा होणार तसाच इक्बाल नसल्याचा फायदा भारताला होईल. त्यामुळे फक्त विराट कोहलीचीच चर्चा व्हायला नको.’ सामन्याच्या पुर्वसंध्येला बोलताना मोर्तझाचा आत्मविश्वासाने बोलत होता. ‘भारताविरोधात आम्ही शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळलोल होतो. भारताला आम्ही एका सिरिजमध्ये पराभव केला आहे. तसेच २००७ च्या विश्वचषकातही भारताचा आम्ही पराभव केला आहे. त्याचप्रमाणे टी २० विश्वचषकात आम्ही विजयाच्या जवळ पोहचलो होतो. आम्हाला प्रत्येक विरोधी संघाबरोबर विजय मिळवायचा आहे.’

गेल्या काही वर्षांत बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कौतुकास्पद प्रगती केलेली आहे. २०१६ मध्ये मायभूमीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तसेच २०१२मध्येसुद्धा त्यांनी मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत मजल मारली होती.  कर्णधार मश्रफी मोर्तझा, अनुभवी अष्टपैलू शकिब-अल-हसन, मुशफिकर रहिम यांच्या समावेशामुळे बांगलादेशचा संघ समतोल वाटत आहे. मुस्तफिझूर रेहमान, रुबेल हसन आणि फिरकीपटू मेहदी हसन यांच्यावर गोलंदाजीची धुरा आहे.