आशिया चषक स्पर्धेतील बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील लढत चांगलीच रोमहर्षक ठरली. अफगाणिस्तानने १२८ धावांचे लक्ष्य गाठत बांगलादेशवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तान संघ सुपर ४ मध्ये पोहोचला आहे. नजीबुल्ला झदरानने अवघ्या १७ चेंडूंमध्ये तब्बल ४३ धावा करून अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला.

बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या १२८ धावांचे लक्ष्य गाठताना अफगाणिस्तानचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. हजरतुल्ला झाझाई (२३, पायचित), रहमानउल्ला गुरबाज (११, यष्टिचित) हे दोन्ही सलामीवीर खास कामगिरी करू शकले नाहीत. त्यानंतर इब्राहीम झदरान-नजीबुल्ला झदरान या जोडीने संघाला विजयापर्यंत नेलं. दोघांनीही मोठे फटके मारत बांगलादेशच्या हातातून विजय खेचून आणला. नाबाद खेळी करत इब्राहीम, नजीबुल्ला यांनी अनुक्रमे ४२ आणि ४३ धावा केल्या. ज्यामुळे अफगाणिस्तानला विजयाची गोडी चाखता आली.

हेही वाचा >>> त्याने बांगलादेशच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं अन् रचला ‘हा’ अनोखा विक्रम; अफगाणीस्तानच्या गोलंदाजाने केली कमाल

बांगलादेशने नाणेफेक जिंकून सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय सुरुवातीला काहीसा चांगला ठरला नाही. अफगाणिस्तानच्या नजीब उर रहमान याने बांगलादेशच्या पहिल्या फळीतील तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. फलंदाज मोहम्मद नईम (६), अनामुल हक (५) स्वस्तात बाद झाले. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या शकीब अल हसनने ११ धावा केल्या.

हेही वाचा >>> रवींद्र जडेजा आगामी आयपीएल गुजरात टायटन्स संघाकडून खेळणार? ‘त्या’ एका ट्वीटमुळे चर्चा

त्यानंतर फिरकीपटू राशीद खानने आपली कमा दाखवत मुशफिकुर रहीम (१), अफिफ हुसैन (१२) यांना पायचित केलं. तसेच मैदानावर स्थिरावलेल्या महमुदुल्लाह यालादेखील राशीद खाननेच २५ धावांवर बाद केलं. बांगलादेशचे पहिल्या आणि मधल्या फळीतील पाच फलंदाज संघाच्या ५५ धावांच्या आतच बाद झाले. त्यामुळे बांगलादेशची स्थिती दयनीय झाली. त्यानंतर मोसाद्देक हुसेन याने एकट्याने किल्ला लढवत संघाला वीस षटकांत १२७ धावांपर्यंत नेऊन ठेवलं. त्याने ३१ चेंडूंमध्ये नाबाद ४८ धावा केल्या.

हेही वाचा >>> केएल राहुलच्या जागेवर ऋषभ पंत? की दीपक हुडाला मिळणार संधी; हाँगकाँगविरोधात ‘अशी’ असेल टीम इंडिया

गोलंदाजी विभागात अफगाणिस्तानच्या नजीब उर रहमान आणि राशीद खान यांनी बांगलादेशी फलंदाजांना बांधून ठेवलं. त्यांनी विरोधी संघाच्या खेळाडूंना मोठे फटके मारू दिले नाहीत. नजीब आणि राशीद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर बांगलादेशचा एक फलंदाज धावबाद झाला.

हेही वाचा >>> भारताचा ‘हुकुमी एक्का’ परतणार का? दुखापतीतून सावरणाऱ्या बुमराहबद्दल BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

तर दुरीकडे बांगलादेशचे गोलंदाज अफगाणिस्तानच्या फलंदाजांना रोखू शकले नाहीत. शकीब अल हसन, मोसाद्देक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. बांगलादेशने शेवटपर्यंत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांना अपयश आलं.