Asia Cup 2022 IND vs PAK: आशिया चषकमध्ये भारत आणि पाकिस्तान २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार आहेत. सामन्यापूर्वी दोन्ही संघ जोरदार सराव करत आहेत. या दोन्ही देशातील तणाव पाहता केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर या संघांच्या फॅन्समध्ये सोशल मीडियापासून ते गल्लीपर्यंत चढाओढ पाहायला मिळते. तणाव किंवा वाद कितीही असले तरी असं म्हणतात की क्रिकेट हा जंटलमन्सचाचा खेळ आहे. अशीच काहीशी खेळाडूवृत्ती दाखवणारा एक व्हिडीओ सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डने ट्विटरवरून शेअर केला आहे. यामध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा पाकिस्तानचा खेळाडू शाहीन आफ्रिदीशी बोलताना दिसतोय, त्यांच्या काही सेकंदांच्या गप्पांमध्ये आफ्रिदीने विराटला म्हटलेलं एक वाक्य सर्वांचं मन जिंकून गेलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला असला तरी दुबईत पाकिस्तान संघासोबत उपस्थित आहे. आफ्रिदी जेव्हा दोन्ही संघांचा सराव पाहायला पोहचला होता तेव्हा तिथे उपस्थित भारतीय खेळाडूंनीही त्याची भेट घेतली. विराटसह केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी सुद्धा आफ्रिदीच्या दुखापतीची चौकशी करून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. (हे ही वाचा: India Vs Pakistan सामन्याआधी धोनीच्या आठवणीत विराट झाला भावूक; रात्री फोटो पोस्ट करत म्हणाला..)

विराट आणि आफ्रिदीच्या संभाषणात आपण ऐकू शकता की, आफ्रिदी विराटला आपल्या प्रकृतीविषयी सांगताना विश्वचषकापर्यंत आपण ठणठणीत होऊ असे म्हणाला. यानंतर आम्ही अशी दुवा करतो की तुमचा गेलेला फॉर्म लवकरात लवकर पुन्हा सापडावा असे म्हणत आफ्रिदीने विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट आणि शाहीन आफ्रिदी भेट

अलीकडे काही सामन्यांमध्ये विराटचा फॉर्म बिघडल्याने भारताच्या इंग्लंड दौऱ्याच्या समाप्तीनंतर त्याला विश्रांती देण्यात आली होती. आगामी आशिया चषक २०२२ मध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुनरागमन करणार आहे. (हे ही वाचा: IND vs PAK T20 Asia Cup 2022: शेन वॉटसनचं भाकीत खरं ठरणार? म्हणाला, भारत विरुद्ध सामन्यात पाकिस्तानला पूर्ण विश्वास की…)

यापूर्वी कोहलीने बाबर आझमची भेट घेतल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला होता. सध्या हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून प्रतिस्पर्धी असूनही माणुसकी दाखवल्याबद्दल या दोन्ही खेळाडूंचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.